युक्रेनने लुहान्स्कमधील मुलांवर जैविक शस्त्राचा प्रयोग केला होता

- रशियन लष्कराचा गंभीर आरोप

मॉस्को –  2020 साली राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या सरकारने युक्रेनच्या लुहान्स्क येथील मुलांवर टीबीच्या विषाणूचा प्रयोग करून पाहिला होता. युक्रेनच्या लुहान्स भागातील जनता रशियासमर्थक मानली जाते. म्हणूनच इथल्या मुलांचा अशा जैविक शस्त्रांच्या प्रयोगासाठी, प्रयोगशाळेतील उंदिरांसारखे वापरण्यात आले, अशी जळजळीत टीका रशियाने केली आहे.

दीड महिन्यापूर्वी रशियाने युक्रेनमधील बायोलॅब्स अर्थात जैविक प्रयोगशाळांची धक्कादायक माहिती उघड केली होती. अमेरिकेकडून 22 कोटी डॉलर्सचे फंडिंग मिळालेल्या या प्रयोगशाळांमध्ये जैविक शस्त्रांची निर्मिती होत असल्याचा आरोप रशियाने केला होता. याबाबतचे पुरावे आपल्याकडे असल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयाच्या ‘रेडिओॲक्टिव्ह, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रोटेक्शन फोर्सेस’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह यांनी जाहीर केले होते.

दोन दिवसांपूर्वी माध्यमांना माहिती देताना किरिलोव्ह यांनी युक्रेनचे लष्कर आपल्याच जनतेविरोधात विषाणूंचा वापर करीत असल्याचा आरोप केला. 2020 साली युक्रेनच्या पूर्वेकडील लुहान्स्क प्रांतातील स्टेपोवो गावातील मुलांवर टीबीच्या अत्यंत घातक विषाणूंचा प्रयोग केला. बनावट नोटांच्या आकारात तयार केलेल्या पत्रकांवर टीबीचे विषाणू सोडले होते. युक्रेनच्या लष्कराने स्टेपोवो गावातील मुलांमध्ये ही पत्रके वाटली होती, असा दावा किरिलोव्ह यांनी केला.

रशियन लष्कराने या पत्रकांचा अभ्यास केल्यानंतर त्यावर टीबीचे विषाणू आढळले आहेत. या विषाणूवरील औषध फारच महाग असून ते मिळविणे देखील अवघड असल्याचे किरिलोव्ह यांनी सांगितले. लुहान्स्क प्रांताच्या ‘सॅनिटरी ॲन्ड एपिडेमोलॉजीकल स्टेशन’नेच तयार केलेल्या अहवालाचा दाखला किरिलोव्ह यांनी दिला. यानुसार, स्टेपोवो गावातून आढळलेल्या पत्रकांवरील टीबीचे विषाणू प्रयोगशाळेत तयार झाल्याचे म्हटले होते. तर लुहान्स्कमधील एका दवाखान्यानेही सदर पत्रकांवर मानवनिर्मित विषाणूचा फैलाव केला असावा, अशी शक्यता वर्तविली होती, असे दावे किरिलोव्ह यांनी केले आहेत.

अमेरिकेने जैविक शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या प्रयोगशाळा युक्रेनमध्ये उभारल्याचा आरोप रशिया आधीपासून करीत आहे. याचे पुरावे आपल्या हाती सापडले असून काही पुरावे रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला त्याच दिवशी अमेरिकेने नष्ट केल्याचे रशियाने म्हटले होते. अशा एकूण 30 प्रयोगशाळा युक्रेनमध्ये असून त्यांना अमेरिकेचे फंडिंग मिळत असल्याचा ठपका रशियाने युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतर केला होता.

युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांमध्ये प्लेग, अँथ्रॅक्स, कॉलेरा, ट्युलारेमिया आणि काही इतर विषारी विषाणूंवर संशोधन सुरू असल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला होता. अमेरिकेला रशियाच्या सीमेजवळ युक्रेनमध्येच जैविक शस्त्रनिर्मितीची प्रयोगशाळा का सुरू करावीशी वाटली, असा प्रश्न रशियाने विचारला होता.

leave a reply