हंटर बायडेन यांच्याशी संबंधित माहिती रशियन कटाचा भाग असल्याचे सांगण्यासाठी दबाव आणला होता

सीआयएच्या माजी संचालकांचा दावा

Michael Morellवॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन याच्या लॅपटॉपसंदर्भात उघड झालेली माहिती हा रशियन कटाचा भाग आहे, असे सांगण्यासाठी दबाव आणला गेल्याचा दावा सीआयएच्या माजी संचालकांनी केला. अमेरिकी गुप्तचर यंत्रणा सीआयएचे माजी संचालक माईक मॉरेल यांनी संसदीय समितीला दिलेल्या माहितीतून ही गोष्ट उघड झाली आहे. अमेरिकी संसदेतील प्रतिनिधीगृहात सध्या हंटर बायडेन यांच्याशी निगडीत विविध प्रकरणांची चौकशी सुरू आहे.

२०२० साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी हंटर बायडेनच्या वादग्रस्त लॅपटॉपची माहिती समोर आली होती. अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क पोस्ट’ या दैनिकाने यासंदर्भात विस्तृत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र त्यानंतर काही दिवसांनीच अमेरिकेतील इतर माध्यमांनी हंटर बायडेनचा लॅपटॉप हा रशियाने राबविलेल्या अपप्रचार मोहिमेचा भाग असल्याचे दावे केले. या दाव्यांमागे जवळपास ५० माजी गुप्तचर अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन लिहिलेले पत्र हा घटक कारणीभूत ठरला होता.

Hunter_Biden_is_seenया पत्रासाठी माईक मॉरेल यांनी पुढाकार घेतला होता. त्यांना बायडेन यांचे निकटवर्तिय असणारे अँथनी ब्लिंकन यांनी तसे करण्याची विनंती केली होती, असे मॉरेल यांनी संसदीय समितीसमोर झालेल्या सुनावणीत सांगितले. अमेरिकी माध्यमांनी रशियन अपप्रचाराची गोष्ट रंगवून सांगण्यास सुरुवात केल्याने बायडेन यांना त्यांचा लाभ मिळाल्याचे समोर आले आहे.

बायडेन यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हंटर बायडेनशी निगडीत अनेक प्रकरणे बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाने हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला असून त्याची संसदीय समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीतून अनेक मुद्दे समोर येत असून लॅपटॉप व त्यातील माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष बायडेन अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हिंदी

leave a reply