पंतप्रधान राजपक्षे यांना मिळालेले बहुमत भारत-श्रीलंका सहकार्यासाठी नवी संधी – भारतीय उच्चायुक्तांचा दावा

कोलंबो/नवी दिल्ली – रविवारी श्रीलंकेचे नेते महिंदा राजपक्षे यांनी चौथ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राजपक्षे यांना मिळालेले बहुमत भारत व श्रीलंकेतील द्विपक्षीय सहकार्यासाठी नवी संधी ठरेल, अशा शब्दात श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी त्यांचे अभिनंदन केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच राजपक्षे यांना फोन करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान राजपक्षे

गेल्या आठवड्यात श्रीलंकेत संसदीय निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून महिंदा राजपक्षे यांच्या ‘एसएलपीपी’ पक्षाला २२५ पैकी १४५ जागा मिळाल्या आहेत. सहकारी पक्षासह जिंकलेल्या जागांची संख्या १५० झाली असून संसदेत राजपक्षे यांना दोन तृतियांश बहुमत प्राप्त झाले आहे. गेल्या पाच दशकात राजपक्षे यांना मिळालेला हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत, महिंदा राजपक्षे यांचे भाऊ गोताबाया राजपक्षे ५२ टक्‍क्‍यांहून अधिक मते मिळवून विजयी झाले होते. यावेळी झालेल्या संसदीय निवडणुकीत राजपक्षे यांच्या पक्षाला जवळपास ६० टक्के मते मिळाल्याचे समोर आले. ही वाढलेली टक्केवारी म्हणजे श्रीलंकेच्या मतदारांनी राजपक्षे यांच्या नेतृत्वाला दिलेला निर्णायक कौल आहे, असा दावा स्थानिक विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.

यापूर्वी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषविलेल्या महिंदा राजपक्षे यांची ओळख चीनधार्जिणे व भारतद्वेष्टे नेते अशी होती. काही वर्षांपूर्वी निवडणुकीत झालेला पराभवामागे भारताचा हात असल्याचे आरोपही त्यांच्याकडून करण्यात आले होते. मात्र चिनी कर्जाचा विळखा, ढासळलेली आर्थिक कामगिरी आणि दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजपक्षे यांच्या भारतासंदर्भातील धोरणात बदल झाल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गोताबाया राजपक्षे यांनी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची केलेली निवड याचे ठळक उदाहरण ठरते.

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनच्या वर्चस्ववादी कारवायांना विरोध करणारी मजबूत आघाडी आकार घेत आहे. यापूर्वी चीनने राजपक्षे यांच्या कारकिर्दीत श्रीलंकेशी साधलेली जवळीक पाहता येणाऱ्या काळात श्रीलंकेची यासंदर्भातील भूमिका महत्त्वाची ठरू शकते. अशा पार्श्वभूमीवर, भारताने श्रीलंकेबरोबरील आपले संबंध दृढ करुन सहकार्याच्या नव्या संधींची शक्यता चाचपणे निर्णायक पाऊल ठरू शकते.

leave a reply