छत्तीसगडमध्ये वॉन्टेड माओवाद्यांसह बारा माओवाद्यांचे आत्मसमर्पण

- ओडिशात माओवाद्यांचे चार तळ नष्ट

दंतेवाडा/भुवनेश्वर – छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये पोलिसांची हत्या आणि हिंसक हल्ल्यांमध्ये सामील असलेल्या चंदूराम सेतिया या वॉन्टेड माओवाद्यासह १२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. शरण आलेल्यांमध्ये चंदूरामसह चार माओवाद्यांच्या शीरावर ईनाम होते. दुसरीकडे ओडिशातही माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. ओडिशाच्या बारगड जिल्ह्यातील जंगलात पोलीस आणि माओवाद्यांची चकमक उडाली. माओवाद्यांनी इथून पलायन केले असले तरी या जंगलातील माओवाद्यांचे चार तळ उद्ध्वस्त करण्यात यश आले. येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रेआणि बंदी घातलेले साहित्य जप्त करण्यात आले.

दंतेवाडा व आजूबाजूच्या भागात पोलिसांनी जून महिन्यांपासून पोलिसांनी ‘लोन वर्राटू’ मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेत शरण येणाऱ्या माओवाद्यांचे पुनर्वसन केले जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत ८३ माओवाद्यांनी शरण आले आहेत. रविवारी पोलीस आणि सीआरपीएफच्या उपस्थितीत १२ माओवाद्यांनी आत्मसमर्पपण केले. शरण आलेल्या माओवाद्यांमध्ये चंदूराम याचाही समावेश आहे.

चंदूराम हा माओवाद्यांच्या प्लाटून नंबर २६ चा सक्रिय सदस्य होता आणि सुरक्षा दलावर झालेल्या तीन मोठ्या हल्ल्यांमध्ये सहभागी होता. २००८ साली भुसारस-चिंगावरममध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २३ पोलीस शहीद झाले होते आणि दोन नागरिक मारले गेले होते. या हल्ल्यातही चंदूराम सामील होता. याशिवाय शरण आलेल्या इनामी माओवाद्यांमध्ये लखमू हेमला, सुनील ताती, मनु मंडावी और मैतूराम बरसा यांचा समावेश आहे. माओवादी विचारधारेला कंटाळूनच हे माओवादी शरण आले अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
दुसरीकडे ओडिशामध्ये हिंसक कारवाया घडवून आणण्याचा सीपीआय (माओवादी)चा डाव सुरक्षादलांनी उधळून लावला आहे. इथल्या बरगढ जिल्ह्यातील गंधमार्दन जंगलात माओवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सीआरपीएफच्या जवानांसह बरगढ-बोलांगीरचे पोलिसांचे विशेष ऑपरेशन ग्रुपकडून (एसओजी) शोध मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेली ही चकमक अर्धा तास सुरू होती.

पण घनदाट जंगल आणि मुसळधार पावसाचा फायदा घेत हे माओवादी तिथून निसटण्यास यशस्वी ठरले. दहा ते पंधरा माओवादी होते, अशी माहिती ओडिशा पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. या दरम्यान चार ठिकाणी माओवाद्यांची तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये सुरक्षा दलाने दारूगोळा, कारतूस आणि हिंसक कारवायांच्या माहिती असणारी कागदपत्रे सापडली आहेत. यातील हस्ताक्षर माओवाद्यांच्या नेत्याचे असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

leave a reply