कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांकडून तयारीचा आढावा

नवी दिल्ली/मुंबई – देशात शनिवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात कोरोनाने ३८६ जणांचा बळी गेला तर तब्बल ११ हजार ४५८ नवे रूग्ण आढळले. शनिवार रात्रीपर्यंत आणखी सुमारे १० हजार रूग्णांची नोंद झाल्याचे राज्यांकडून प्रसिद्ध केलेल्या माहितीवरून उघड झाले. त्यामुळे कोरोनाच्या रूग्णांची संख्या ३ लाख १७ हजारांच्या पुढे गेली आहे. देशात गेल्या आठवडाभरापासून दरदिवशी सुमारे १० हजार नवे रुग्ण आढळत असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलवली होती. या बैठकीत पंतप्रधानांकडून आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यांच्या सहकार्याने आपत्कालीन योजना बनविण्याचे निर्देश देण्यात आले. पंतप्रधान राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार आहेत.

कोरोना, पंतप्रधान, तयारीचा आढावा

देशात कोरोनाव्हायरसच्या रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून तीन हजाराहून अधिक नवे रूग्ण आढळत आहेत. राज्यात कोरोनामुळे दगवलेल्यांची संख्या ३,८३० वर पोहोचली आहे,तर एकूण रूग्णांची संख्या १,०४,५६८ वर गेल्याचे राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले. शनिवारी महाराष्ट्रात ११३ जणांचा बळी गेला तर ३,४२७ नवे रूग्ण आढळले. मुंबईतच २४ तासात १,३८० रूग्णांची नोंद झाली. तसेच मुंबईत ६९ जणांचा बळी गेला असून शहरातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या २,११३ वर पोहोचली आहे.

दिल्लीतही दोन हजारपेक्षा अधिक नव्या रूग्णांची नोंद झाली असून येथील रूग्णांची संख्या ३८ हजारांवर पोहोचली आहे. तामिळनाडूत कोरोनाच्या रूग्णांची संख्या ४२ हजारांच्या पुढे गेली असून शनिवारी १९८९ नव्या रूग्णांची नोंद झाली. इतर राज्यातही नवे रूग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच एका दिवसात ५०० पेक्षा अधिक रूग्णांची नोंद करण्यात आली होती. लडाखमध्ये १०४, सिक्कीमध्ये ५० नवे रुग्ण आढळले आहे. याआधी लडाख कोरोनामुुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र मे महिन्याच्या अखेरीपासून येथे पुन्हा नव्या रूग्णांची नोंद सुरु झाली आहे. तर एका दिवसात आढळलेल्या १०४ नव्या रुग्णांमुळे चिंता वाढल्या आहेत. गुजरातमध्ये ५१७ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर कर्नाटकात ३०८, केरळ ८५ नवे रुग्ण आढळले आहेत.

leave a reply