क्वाडचे सहकार्य पोकळी भरून काढणारे – भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा

वॉशिंग्टन – ‘आत्ताच्या काळात निर्माण झालेली पोकळी क्वाडच्या सहकार्याने भरून निघत आहे. ही पोकळी एकटा देश भरून काढू शकत नाही. द्विपक्षीय सहकार्यानेही हे कार्य शक्य नाही. त्यासाठी क्वाडसारखे आंतरराष्ट्रीय कायदे मानणारे बहुपक्षीय सहकार्यच आवश्यक ठरते’, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

पोकळीअमेरिकेच्या दौर्‍यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा केली. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील चर्चा फलदायी ठरली, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन म्हणाले. या चर्चेत कोरोनाची साथ, भारत-चीन सीमेवरील परिस्थिती आणि अफगाणिस्तानच्या मुद्याचा समावेश होता, अशी माहिती ब्लिंकन यांनी दिली. तर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या चर्चेमुळे भारत व अमेरिकेचे धोरणात्मक सहकार्य अधिकच भक्कम झाल्याचा दावा केला. तसेच या चर्चेत क्वाडच्या सहकार्याचा मुद्दा अग्रस्थानी असल्याचे समोर येत आहे.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांनी एकत्र येऊन क्वाडचे सहकार्य सुरू केले होते. गेल्या काही महिन्यांपासून या सहकार्याला फार मोठे सामरिक महत्त्व आले आहे. विशेषतः चीनच्या आक्रमकपणात झालेली वाढ क्वाडचे सहकार्य अधिक भक्कम करणारी बाब मानली जात होते. त्याचवेळी क्वाडचे हे सहकार्य चीनच्या विरोधात असल्याचे आरोपही सुरू झाले आहेत.

भारतासारखा देश एखाद्या गटाचा सदस्य बनतो, त्यावेळी अतिशय सखोलपणे विचार केला जातो. आपल्या भूमिकेत स्पष्टता असल्याखेरीज भारत असे निर्णय घेत नाही, असे सांगून क्वाड ही कुणा एका देशाच्या विरोधात असलेली संघटना नाही, असा निर्वाळा पररष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिला. क्वाडद्वारे सागरी सुरक्षा व सहकार्य तसेच जोडणीचा विचार केला जातो, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या पालनाला क्वाडकडून महत्त्व दिले जाते, असे खोचक विधान भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले.

देशांच्या एकसामायिक हितसंबंधांवर चर्चा हे सध्याचे क्वाडचे स्वरुप आहे. सध्या जगात जे काही चाललेले आहे, त्याचे प्रतिबिंब क्वाडच्या सहकार्यामध्ये पडत असल्याचा दावा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केला. क्वाड हा शीतयुद्धाचा भाग नाही. तर शीतयुद्ध मागे टाकून बदलेल्या जगाचे प्रतिनिधित्त्व क्वाडद्वारे केले जात आहे. मात्र जे अजूनही शीतयुद्धाच्या मानसिकतेमध्ये अडकून पडले आहेत, त्यांना क्वाड समजून घेता येणार नाही, असा टोला भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लगावला.
क्वाडचे सहकार्य चीनच्या विरोधातच असल्याचा ठपका या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला होता. क्वाडमधील सहभागावरून बांगलादेशला धमकी देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप केले होते.

leave a reply