क्वाड म्हणजे नाटो नाही

- चीनच्या आक्षेपाला भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे प्रत्युत्तर

अनवी दिल्ली – भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांची क्वाड संघटना म्हणजे आशियाई नाटो असल्याचा ठपका चीनने ठेवला होता. त्याला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिले. नाटो शीतयुद्धाच्या काळातील संकल्पना होती, तर क्वाड हे जगाच्या उत्तम भविष्याला आकार देणारे संघटन आहे, असे जयशंकर म्हणाले. भारत व ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व संरक्षणमंत्र्यांच्या पहिल्याच ‘टू प्लस टू’ चर्चेच्या निमित्ताने परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी क्वाडवरील आक्षेपाला दिलेले उत्तर लक्षवेधी ठरते.

भारत व ऑस्ट्रेलियामधील ही पहिलीच टू प्लस टू चर्चा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पार पडत आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमागारीनंतर या देशात तालिबानची सत्ता येत आहे. याचा लाभ घेऊन चीन अमेरिका महासत्ता उरलेली नाही व आपल्या सहकारी देशांचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य अमेरिकेकडे उरलेले नाही, असे मोठ्या दिमाखात सांगत आहे. तैवान तसेच आसियानचे सदस्य असलेल्या इतर देशांना चीन थेट धमक्या देऊन आपले म्हणणे मान्य करण्यावाचून पर्याय नसल्याचा इशारा देत आहे. चीनच्या या धमकीसत्रातून ऑस्ट्रेलियासारखा देशही सुटलेला नाही.

चीनपासून ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री मरिस पेन यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर चीनमुळे ऑस्ट्रेलियासमोर निर्माण होणार्‍या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर भारत असू शकतो, असा दावा ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ऍबट यांनी नुकताच केला होता. तसेच भारत हा ऑस्ट्रेलियाचा नैसर्गिक भागीदार देश असल्याचेही ऍबट यांनी म्हटले होते. सध्या चीनने ऑस्ट्रेलियाबरोबर व्यापारयुद्ध छेडले असून याचे रुपांतर प्रत्यक्ष युद्धातही होऊ शकते, असे इशारे चीनने दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, भारताच्या ऑस्ट्रेलियाबरोबरील या टू प्लस टू चर्चेला फार मोठे सामरिक महत्त्व आले आहे.

या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर, भारत व ऑस्ट्रेलियाचाही समावेश असलेल्या क्वाडवर चीनने शेरेबाजी केली होती. क्वाड म्हणजे आशियाई नाटो असल्याचा ठपका चीनने ठेवला होता. या आक्षेपाला भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. नाटो ही शीतयुद्धाच्या काळात उदयाला आलेली संकल्पना होती. त्याची क्वाडशी तुलना करता येणार नाही. कारण क्वाड ही जागतिकीकरणाच्या काळात देशांच्या सहकार्याची अनिवार्यता अधोरेखित करणारी संघटना आहे. जगाच्या भवितव्याला आकार देण्याचे कार्य क्वाडद्वारे केले जाऊ शकते, असे सांगून जयशंकर यांनी क्वाडचे समर्थन केले.

दरम्यान, भारत व ऑस्ट्रेलियामध्ये विकसित होत असलेल्या सहकार्यावर चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने शेरेबाजी केली आहे. भारताने १९९८ साली केलेल्या अणुचाचण्यांनंतर भारतावर ऑस्ट्रेलियाने निर्बंध लादले होते आणि त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले होते. पण आता चीनच्या विरोधाने दोन्ही देशांना जवळ आणल्याचा दावा ग्लोबल टाईम्सने केला.

असे असले तरी दोन्ही देशांकडे एकमेकांना देण्यासारखे फारसे काही नाही. तसेच या देशांच्या संरक्षणविषयक सहकार्याचीही पर्वा करण्याची चीनला गरज नाही, असा दावा एका चिनी विश्‍लेषकाच्या हवाल्याने ग्लोबल टाईम्सने केला. पण प्रत्यक्षात भारत व ऑस्ट्रेलियामध्ये विकसित होत असलेल्या या सहकार्याने चीनच्या चिंता वाढल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. विशेषतः भारत व ऑस्ट्रेलियामध्ये होऊ घातलेल्या मुक्त व्यापारी कराराचा आपल्याला फटका बसू शकतो याची जाणीव झाल्यानंतर चीन अधिकच अस्वस्थ झाला आहे.

leave a reply