‘मनी लॉण्डरिंग’ प्रकरणी चिनी कंपन्यांवर छापे

नवी दिल्ली – शेल कंपन्यांच्या आडून ‘मनी लॉण्डरिंग’ करणाऱ्या चिनी कंपन्या आणि त्यांच्या भारतीय सहकाऱ्यांच्या ठिकाणावर सलग दोन दिवस आयकर विभागाने छापे टाकले. हजार कोटी रुपयांचा बेकायदा व्यवहार आणि पैशाचे उलाढाल समोर आली असून एका चिनी नागरिकालाही अटक झाली आहे. याआधी या चिनी नागरिकाला हेरगिरीसाठी अटक झाली होती. विशेष म्हणजे बुधवारी ऑस्ट्रोलियतही चिनी नागरिकांकडून चालविल्या जाणारे असेच ‘मनी लॉण्डरिंग’ रॅकेट उघड झाले असून दोन चिनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

'मनी लॉण्डरिंग'

शेल कंपन्यांच्या मदतीने काही चिनी नागरिक आणि त्यांचे भारतीय भागीदार या गैर व्यवहारात गुंतले असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. चीनच्या नागरिकांच्या नावाने बनावट कागदपत्राच्या आधारे ४० हून अधिक बँक खाती उघडून हे सर्व गैरव्यवहार सुरु होते. या खात्यांमधून सुमारे हजार कोटी रुपयांची उलाढाल होत होती. एका चिनी कंपनीच्या सहाय्यक कंपनीला भारतात रिटेल व्यवसाय व शोरूम उघडण्यासाठी शेल कंपनीच्या खात्यातून १०० कोटी रुपयांची रक्कम आगाऊ देण्यात आली होती.

या तपासात हवाला संदर्भात काही महत्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. याचबरोबर बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग व सीए सहभागी असल्याची देखील उघड होत आहे. या प्रकरणी चार्ली पंग या बनावट नावाने भारतात राहणारा चिनी नागरिक लुओ संग याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून मणिपूरच्या पत्त्यावरून तयार करण्यात आलेला बनावट भारतीय पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. त्याची बनावट नावांनी ८ ते १० बँक खाती असल्याचे समोर येत आहे.चिनी कंपन्यांसाठी तो भारतात हवालाचे रॅकेट हाताळत असल्याची माहिती मिळत आहे. औषधे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या आयात आणि निर्यातीच्या नावाखाली हे ‘मनी लॉण्डरिंग’ सुरु होते.

२०१८ मध्ये लुओ संग याला हेरगिरी, फसवणूक आणि इतर कलमाखाली अटक करण्यात आली होती असे दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने सांगितले. या प्रकरणात अधिक धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे. लडाखच्या गलवान व्हॅलीत भारतीय सैनिकांवर चढविलेला भ्याड हल्ल्यानंतर चिनी कंपन्या सरकारच्या रडारवर आल्या आहेत. नुकतेच चीनच्या अलीबाबा कंपनीवर फेक न्यूज’चे आरोप समोर आले होते. अलिबाबा कंपनीसह भारतात मोठी गुंतवणूक असलेल्या चिनी कंपन्यांचे चिनी लष्कराशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा अहवाल भारताच्या गुप्तचर संस्थेने दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. या पृष्ठभूमीवर चिनी कंपन्यांवरील छापे लक्षवेधी ठरतात.

दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या छाप्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल आपल्याला अधिक माहिती नाही. मात्र परदेशात व्यापार करताना तेथील स्थानिक नियम, कायद्याचे पालन करण्यास चिनी कंपन्यांना चिनी सरकारकडून नेहमी सांगण्यात येते, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच आम्ही चिनी कंपन्या आणि नागरिकांचे कायदेशीर हक्क आणि हितसंबंधांचे संरक्षण करण्यास वचनबद्ध आहोत,” असेही या प्रवक्त्याने सांगितले.

leave a reply