गिलगिट-बाल्टिस्तानमधील सोने व युरेनियमच्या खाणी चीनच्या ताब्यात

- पाकिस्तानने बेकायदेशीर कंत्राटे दिल्याचा स्थानिक नेत्यांचा आरोप

जिनिव्हा – पाकिस्तान सरकारने गिलगिट-बाल्टिस्तान क्षेत्रातील सोने व युरेनियमच्या खाणी चीनच्या घशात घातल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान क्षेत्रातील ‘युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी’चे (यूकेपीएनपी) मुख्य प्रवक्ते नासीर अझिज खान यांनी ही माहिती दिली. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तान सरकारने याच क्षेत्रात सिंधू नदीवर ‘डायमर भाषा’ धरण उभारण्यासाठी चीनबरोबर करार केला होता. पण भारताने त्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. गिलगिट बाल्टिस्तानसह पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, भारतीय सीमेत असे अनधिकृत प्रकल्प खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड इशारा दिला होता. त्याकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानने बेकायदेशीररित्या या भागातील नैसर्गिक स्रोत चीनच्या ताब्यात देण्याचे उद्योग सुरू केले आहेत.

सोने व युरेनियमच्या खाणी

‘यूकेपीएनपी’चे प्रवक्ते नासीर खान यांनी, गिलगिट-बाल्टिस्तान क्षेत्रात चीन व पाकिस्तानकडून इथल्या नैसर्गिक साधनांची लूट सुरू असल्याची टीका केली आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमांसह पाकिस्तानच्या घटनेलाही धाब्यावर बसवण्यात आले आहे. पाकिस्तान सरकारने दोन हजाराहून अधिक सोने, युरेनियम आणि मोलिब्डेनमच्या खाणींच्या उत्खननाचे कंत्राट चिनी कंपन्यांना दिल्याचे खान यांनी म्हटले आहे.

या क्षेत्रातील नैसर्गिक संपत्तीची लूट करणे हे पाकिस्तानी घटनेचे उल्लंघन ठरते.घटनेच्या कलम-२५७च्या अंतर्गत गिलगिट-बाल्टिस्तान क्षेत्रात नैसर्गिक साधनांची नासधूस करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मात्र पाकिस्तान सरकार या कायद्याला पायदळी तुडवित आहे. तसेच स्थानिकांच्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. याविरोधात आवाज उठविणाऱ्याची गळचेपी केली जात आहे. पाकिस्तानची माध्यमेही या भागात पर्यावरणाची हानी सुरू असल्याची दखल घेत नाहीत, याकडे ‘यूकेपीएनपी’च्या प्रवक्त्यांनी लक्ष वेधले.

सोने व युरेनियमच्या खाणी

गिलगिट-बाल्टिस्तान क्षेत्रात चीनला झुकते माप देऊन ही लूट सुरू आहे. चीनने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून हे कंत्राट मिळवल्याचा आरोप नासीर खान यांनी केला आहे. पाकिस्तान चीनच्या हातातील बाहुले बनला असून, त्यांच्याच इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोपही यूकेपीएनपीच्या खान यांनी केला आहे. या विरोधात पुढील महिन्यात जीनिव्हा इथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करू असेही नासीर खान यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या उत्तरेकडील गिलगिट-बाल्टिस्तान आणि डायमर भागात पाकिस्तान सरकारने माध्यमांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. संपूर्ण भागावर पाकिस्तान सरकारद्वारे नियंत्रण ठेवले जात आहे. काही दिवसांपूर्वी इम्रान खान सरकारने चीनबरोबर सिंधू नदीवर ‘डायमर भाषा’ धरण बांधण्यासाठी ४४२ अब्ज रुपयांचा करारही केला आहे. धरण व इतर नैसर्गिक संपत्तीच्या बळावर या भागात ४५ हजार मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकते.

भारताने काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर ‘गिलगिट-बाल्टिस्तान’ आपलाच हिस्सा असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्याच आधारे या क्षेत्रातील पाकिस्तान व चीनच्या सर्व हालचाली बेकायदेशीर असल्याचा दावा भारत सरकारने केला आहे.

leave a reply