मुंबईसह कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपले

मुंबई – मुंबईसह कोकण किनारपट्टीला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. पासवसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले असून मीठी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने कुर्लाच्या क्रांती नगर मधील रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. तर वर्ध्या जिल्ह्यात शुक्रवारी सायकाळी चार नागरिक वाहून गेल्याची घटना घडली. हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Mumbai-Rainशुक्रवारपासून मुंबई आणि आजूबाजूंच्या जिल्ह्यांमध्ये धुवाँधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने शनिवारीही मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली होती. हवामानखात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने कोकण किनारपट्टीला झोडपून काढले. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरादार पाऊस झाला. मुंबई, ठाण्यात सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. लॉकडाउनमुळे रस्त्यावरील गर्दी कमी असली तरी पावसामुळे ट्रॅफिक जाम झाले होते. शहरात बऱ्याच भागात झाडे उन्मळून पडले.

अतिवृष्टीमुळे कणकवलीतील जाणवली आणि गडनदी या दोन्ही नद्यांना मोठा पूर आला आहे. तसेच कुडाळ मधील मुंबई-गोवा महामार्गावरील भंगसाळ नदीलाही पूर आला. याचबरोबर कुडाळ-माणगाव येथील आंबेरी पुलावर पावसाचे पाणी साचल्यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला. कोकणात जवळपास सर्वच जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तळकोकणातील मालवण तालुक्यात सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने खोत जुवा बेटावर पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यासह चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदी पात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Mumbai-Rainकोकणाबरोबर विदर्भांतही काही जिल्ह्यांमध्ये जोरादार पाऊस झाला. वर्धा जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले असून नद्यांना पूर आला आहे, शुक्रवारी संध्याकाळी बैलगाडीने काही मजूर जात असता बैलगाडी पुरात वाहून गेली. यात चार जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूरमध्येही जोरदार पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे नद्यांची पातळी वाढली आहे. नाशिकमध्ये नद्यांची पातळीत वाढ झाली, धुळे जळगावमध्ये देखील पावसाचा जोर दिसून आला. खान्देशात जळगावात तापी, पूर्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने हॊतनूर धरणाचे ६ दरवाजे उघडावे लागले.

leave a reply