भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पावणे सात लाखांजवळ

- महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दोन लाखांच्या पुढे

नवी दिल्ली/ मुंबई – एका दिवसात कोरोनाचे सुमारे २३ हजार नवे रुग्ण आढळल्याने शनिवारी सकाळपर्यंत देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या साडे सहा लाखांजवळ पोहोचली होती. तर रात्रीपर्यंत देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या ६ लाख ७० हजारांच्या पुढे गेली. तसेच देशातील कोरोनाच्या बळींची संख्या १९ हजारांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात चोवीस तासात सात हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली.

तसेच पश्चिम बंगाल, केरळ, गुजरात आणि कर्नाटक राज्यांमध्येही चोवीस तासात नवे रुग्ण संख्या सापडण्याचा नवा उच्चांक नोंदविण्यात आला.

India-Coronaदेशात कोरोनाच्या टेस्टिंगमध्ये वाढ करून दिवसाला २ लाख ४० हजारांपेक्षा जास्त चाचण्या होऊ लागल्या आहेत. ३ जुलैला तब्बल २,४२,३८३ चाचण्या देशभरात घेण्यात आल्या. आतापर्यंत देशात ९५ लाखांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. तसेच या साथीचे रुग्ण बरे होण्याचा दर ६०.८० टक्क्यांवर पोहोचला आहे. जास्त चाचण्या घेण्यात येण्यात येत असल्याने रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढले आहे. शुक्रवारी देशात २२,७७१ नवे रुग्ण आढळले होते. तर शनिवारीही सुमारे तितक्याच नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे राज्यांनी रात्रीपर्यंत जाहीर केलेल्या माहितीवरून स्पष्ट आहे.

महाराष्ट्रात चोवीस तासात २९५ जणांचा बळी गेला आणि ७,०७४ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत ६८ जणांचा बळी गेला असून १,१६३ नवे रुग्ण आढळले. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. तामिळनाडूत दिवसभरात ६५ जण दगावले आणि ४,२८० नवे रुग्ण आढळले. दिल्लीत २५. नव्या रुग्णांची नोंद झाली, दिल्लीतील कोरोनाच्या बळींची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे.

पश्चिम बंगालमध्ये ७४३ नवे रुग्ण आढळले. कर्नाटकात १६९४, तेलंगणात १८९२, अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. ओडिशात ४९५, आंध्र प्रदेशात ७६५, गुजरातमध्ये ६८७ नवे रुग्ण चोवीस तासात आढळले.

दरम्यान, केंद्र सरकारने १ एप्रिलपासून आतापर्यंत २ कोटी एन९५ मास्क आणि १.८ कोटी पीपीई किट्स राज्यांना पुरविले आहेत. तसेच ११,३०० व्हेंटीलेटर्सही राज्यांना केंद्राकडून देण्यात आले. याशिवाय १.०२ लाख ऑक्सिजन सिलेंडर्स आणि ६.१२ कोटी हायड्रोक्लोरीक्वीनच्या गोळ्या पुरविण्यात आल्या आहेत.

leave a reply