जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चोवीस तासात विक्रमी वाढ

लंडन – गेल्या चोवीस तासात जगभरात कोरोनाव्हायरसच्या २,९४,२३७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सहा हजाराहून अधिक जणांचा या साथीने बळी घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याची माहिती प्रसिद्ध केली. जगभरात एका दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत पहिल्यांदाच एवढी मोठी वाढ झाली आहे. अमेरिका, ब्राझील आणि भारत या तीन देशांमध्ये जगभरातील निम्म्याहून अधिक साथीचे रुग्ण आढळले आहेत.

जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चोवीस तासात विक्रमी वाढकोरोनाव्हायरसच्या साथीने आतापर्यंत जगभरात ७,७०, ०९४ जण दगावले आहेत. यामध्ये गेल्या चोवीस तासात या साथीने दगावलेल्या ६,७०० हून अधिक रुग्णांचा समावेश आहे. यापैकी अमेरिकेत १,०२९ तर भारतात ९४४ आणि ब्राझीलमध्ये ७०९ जणांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या साथीने अमेरिकेत १,७२, ७४३ तर ब्राझीलमध्ये १,०७,२९७ जण गतप्राण झाले आहेत. यापैकी अमेरिकेतील या साथीच्या बळींची संख्या पुढच्या दोन आठवड्यात १८ हजारांनी वाढून १,९०,००० पर्यंत जाईल, असा दावा अमेरिकेच्या आरोग्य संघटनेने केला. तर मेक्सिकोच्या ५६ हजार आणि भारतातील ५० हजाराहून अधिक कोरोनाच्या बळींचा समावेश आहे.

कोरोनाच्या या साथीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या माहितीतून उघड झाले आहे. शनिवारी या साथीच्या रुग्णांनी जवळपास तीन लाखापर्यंत मजल मारली असून भारतात ६३,४९० तर अमेरिकेत ४७, ९१३ आणि ब्राझीलमध्ये ४१,५७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या अमेरिकेत या साथीचे ५५ लाख तर ब्राझीलमध्ये ३३ लाख आणि भारतात २६ लाखाहून अधिक रुग्ण आहेत. तर फ्रान्स, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंडमध्ये या साथीची दुसरी लाट धडकल्याचा दावा केला जातो. याबरोबर जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या २,१६,८१,९७९ वर गेली आहे.

दरम्यान, या साथीतून आतापर्यंत जवळपास दीड कोटी जण बरे झाले आहेत. कोरोनाची लस तयार करण्यासाठी जगभरातील आघाडीच्या देशांमध्ये स्पर्धा सुरू आहे. इस्रायल आणि ’संयुक्त अरब अमिरात’ (युएई) या साथीवर लस तयार करण्यासाठी एकत्र आले आहेत.

leave a reply