कोरोनाव्हायरस व वुहान लॅबच्या संबंधाची गोपनीय माहिती प्रसिद्ध करा – अमेरिकी संसद सदस्यांची मागणी

वॉशिंग्टन – ‘कोरोनाचे मूळ आणि त्याचा विषाणू प्रयोगशाळेतून पसरला असण्याची शक्यता या दोन्ही बाबतीत वुहान लॅब तपासाच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिका व ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ही (डब्ल्यूएचओ) यासंदर्भात चौकशी करीत आहे. संसदीय समितीला गोपनीय कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यास लॅबमधून झालेल्या कथित अपघाताच्या शक्यतेचा तपास करता येईल. यासंदर्भात अमेरिकी प्रशासनाकडे माहिती प्रसिद्ध केल्यास वुहान लॅबसंदर्भात जी काही परस्परविरोधी वक्तव्ये व चर्चा सुरू आहे, त्यालाही आळा घालता येईल’, या शब्दात अमेरिकी संसद सदस्यांनी परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांना, ‘वुहान लॅब’संदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

गोपनीय माहितीकाही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री व ‘सीआयए’चे माजी संचालक माईक पॉम्पिओ यांनी, कोरोनाची साथ चीनच्या प्रयोगशाळेतूनच उगम पावल्याचे वक्तव्य केले होते. त्यांनी आपल्या वक्तव्यात, परिस्थितीजन्य पुरावे व चीनच्या राजवटीकडून प्रयोगशाळेसंदर्भातील माहिती दडपण्यासाठी चाललेले जोरदार प्रयत्न या गोष्टी कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहानमधील लॅबमध्येच झाल्याचे दाखवून देतात, असाही दावा केला होता. पॉम्पिओ परराष्ट्रमंत्री पदावर असताना अमेरिकेने, चीनचे लष्कर व वुहान लॅबमधील संबंध तसेच लॅबमध्ये सुरू असणारे संशोधन यांची ‘फॅक्ट शीट’ प्रसिद्ध केली होती.

या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या संसदीय समितीने परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांना लिहिलेले पत्र महत्त्वाचे ठरते. हे पत्र ‘ओव्हरसाईट अ‍ॅण्ड इन्व्हेस्टिगेशन्स कमिटी’चे सदस्य मॉर्गन ग्रिफिथ व सहकार्‍यांनी लिहिले असून, त्यावर पत्रावर ‘हाऊस एनर्जी अ‍ॅण्ड कॉमर्स कमिटी’मधील सदस्यांच्याही स्वाक्षर्‍या आहेत. परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी स्वतः गेल्या महिन्यात दिलेल्या एका मुलाखतीत कोरोनाव्हायरसचे मूळ शोधणे आवश्यक असल्याचे वक्तव्यही केले होते.

गोपनीय माहितीदरम्यान, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाव्हायरसचा उल्लेख ‘चायनीज व्हायरस’ असा केल्याने बदनामी झाल्याचा दावा करीत याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘चायनीज अमेरिकन सिव्हिल राईट्स कोअ‍ॅलिशन’ या अमेरिकेतील गटाने ही याचिका दाखल केली आहे. ट्रम्प यांनी आपल्या कारकिर्दीत कोरोनाचा उल्लेख ‘चायनीज व्हायरस’, ‘वुहान व्हायरस’ व ‘कुंग फ्ल्यू’ असा केला होता. अशा प्रकारच्या उल्लेखामुळे अमेरिकेतील चिनी व इतर आशियाई वंशाच्या नागरिकांविरोधातील हिंसेचे प्रमाण वाढले, असा दावा यचिकेत करण्यात आला आहे. याप्रकरणी ट्रम्प यांनी 2 कोटी 23 लाख डॉलर्सची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोरोनाव्हायसमुळे बळी गेलेल्यांची संख्या प्रत्यक्षात सांगण्यात आलेल्या माहितीपेक्षा दुप्पट किंवा तिपटीहून अधिक असू शकते, असा खळबळजनक दावा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) केला आहे. यात कोरोनामुळे थेट झालेले मृत्यू तसेच त्याच्या अप्रत्यक्ष परिणांमुळे गेलेले बळी यांचा समावेश आहे, असे ‘डब्ल्यूएचओ’च्या सहाय्यक महासंचालक समिरा अस्मा यांनी म्हटले आहे. 2020 सालातच कोरोनाच्या साथीमुळे 30 लाखांहून अधिक बळी गेले होते, असे ‘डब्ल्यूएचओ’च्या अहवालात सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी, ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अ‍ॅण्ड इव्हॅल्युएशन’ (आयएचएमई) या गटाने सादर केलेल्या अहवालातही, जगभरात कोरोनाच्या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या सध्याच्या अधिकृत जाहीर नोंदीपेक्षा दुपटीहून अधिक असल्याचा दावा करण्यात आला होता.

चीनकडून कोरोनाबाबत ‘फेक न्यूज’चा प्रसार – तैवानचा आरोप

तैपेई – तैवानमध्ये कोरोनाची साथ वाढत असतानाच, चीन आक्रमक दबावतंत्राचा वापर करून तैवानी जनतेत असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप तैवानच्या वरिष्ठ मंत्र्यांनी केला. ‘‘‘चीनचे हे प्रयत्न वेळीच रोखणे आवश्यक असल्याने तैवान सरकार सातत्याने कोरोनासंदर्भातील माहिती जनतेला देत आहे. चीनच्या ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’पासून तैवानी समाजाला सुरक्षित राखण्यास आमचे प्राधान्य आहे’’, असे तैवानचे अंतर्गत सुरक्षा उपमंत्री शेन संग-येन यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांना कोरोना झाल्याचे वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाले होते. हा चीनच्या ‘फेक न्यूज’चा भाग होता, असा दावाही तैवानी मंत्र्यांनी यावेळी केला.

leave a reply