जेरूसलेममध्ये पुन्हा दंगली उसळल्या

- २० जण जखमी

जेरूसलेम – इस्रायल आणि गाझातील हमासमध्ये संघर्षबंदी जाहीर होऊन काही तास होत नाही, तोच जेरूसलेममध्ये पुन्हा दंगली उसळल्या. यावेळी इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी तरुणांमध्ये झालेल्या संघर्षात २० जण जखमी झाले आहेत. यावेळी काही तरुणांनी हमासच्या समर्थनार्थ तर पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या फताह पक्षाच्या विरोधात घोषणा दिल्या. यानंतर इस्रायल तसेच वेस्ट बँकच्या महत्त्वाच्या शहरांमधील तसेच प्रार्थनास्थळांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

इस्रायल-पॅलेस्टिनींमधील संघर्ष वाढला - चिंता व्यक्त करणार्‍या अमेरिकेला इस्रायलने फटकारलेशुक्रवारी सकाळपासूनच जेरूसलेमच्या अल अक्साच्या परिसरात पॅलेस्टिनी तरुणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी काही तरुणांनी हमासचे ध्वज हातात घेऊन इस्रायलविरोधी घोषणा दिल्या. याच निदर्शनात हमाससमर्थक तरुणांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष अब्बास यांच्या फताह पक्षाविरोधात नारेबाजीही केली. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत.

यावेळी काही पॅलेस्टिनी तरुणांनी इस्रायली जवानांवर दगडफेक केल्याची माहिती इस्रायली पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली. त्यानंतर इस्रायली पोलीस आणि या पॅलेस्टिनी तरुणांमध्ये संघर्ष पेटला. यावेळी इस्रायली जवानांनी अश्रुधूराचा वापर केला. या कारवाईत २० पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी याच भागात मोठ्या प्रमाणात दंगल पेटली होती. त्यानंतर इस्रायल व वेस्ट बँकच्या लोद, रामल्ला या प्रमुख शहरांमध्येही याचे लोण पसरले होते. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता, इस्रायलने प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा वाढविली आहे.

leave a reply