अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याविरोधात रिपब्लिकन पार्टीकडून अविश्‍वास प्रस्ताव दाखल

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमधील माघार व मेक्सिको सीमेवरील निर्वासितांची समस्या हाताळण्यात आलेले अपयश या मुद्यांवरून रिपब्लिकन पक्षाने राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला आहे. ओहिओतील संसद सदस्य बॉब गिब्स यांच्या पुढाकाराने हा प्रस्ताव मांडण्यात आला असून इतर तीन संसद सदस्यांनीही त्याला अनुमोदन दिले आहे. काही दिवसांपूर्वीच सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षातील एक गट राष्ट्राध्यक्षांचे अधिकार कमी करण्यासाठी विधेयक आणणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या पार्श्‍वभूमीवर, रिपब्लिकन पक्षाकडून दाखल झालेला अविश्‍वास प्रस्ताव लक्ष वेधून घेणारा ठरतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याविरोधात रिपब्लिकन पार्टीकडून अविश्‍वास प्रस्ताव दाखल

‘राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडेन यांनी मेक्सिको सीमेवरील निर्वासितांच्या समस्येकडे पूर्ण दुर्लक्ष केले. ही बाब अमेरिकेचे सार्वभौमत्त्व सुरक्षित ठेवण्यासाठी आलेले अपयश दर्शविते. या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही त्यांनी धुडकावून लावले. कोरोनाचे रुग्ण असणार्‍या निर्वासितांना अमेरिकेत घुसखोरी करू दिली. अफगाणिस्तानमधील माघार ही केवळ आपत्ती नाही. अमेरिकी नागरिकांची सुटका करण्यापूर्वी त्यांनी अमेरिकी जवानांना माघारी आणले व त्यातून नागरिकांचा जीव धोक्यात घातला’, असे घणाघाती आरोप करीत बॉब गिब्स अविश्‍वास ठराव दाखल केल्याची माहिती दिली.

गिब्स यांनी प्रतिनिधीगृहात दाखल केलेल्या या अविश्‍वास प्रस्तावाला अँडी बिग्ज्, ब्रायन बॅबिन आणि रँडी वेबर या रिपब्लिकन संसद सदस्यांनी अनुमोदन दिले आहे. सध्या संसदेत डेमोक्रॅट पक्षाचे बहुमत असल्याने अविश्‍वास ठरावाला समर्थन मिळणार नाही याची कल्पना आहे, असे गिब्स यांनी स्पष्ट केले. मात्र २०२२ सालच्या ‘मिडटर्म इलेक्शन’नंतर परिस्थिती बदलू शकते, असा दावाही त्यांनी केला. राष्ट्राध्यक्ष बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष हॅरिस व संपूर्ण प्रशासनाला आपण नोटिस देत आहोत, असा इशाराही संसद सदस्य गिब्स यांनी दिला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याविरोधात रिपब्लिकन पार्टीकडून अविश्‍वास प्रस्ताव दाखलदरम्यान, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरोधात अमेरिकी जनतेत असणारी नाराजी वाढत असल्याचे विविध सर्वेक्षणांमधून समोर येत आहे. आयोवा प्रांतात केलेल्या एका सर्वेक्षणात तब्बल ६२ टक्के नागरिकांनी बायडेन यांच्या कारभारावर नाराजी दर्शविली आहे. मार्च महिन्यात बायडेन यांच्यावर नाराज असणार्‍यांची संख्या ४४ टक्के होती. मात्र अफगाण माघारीच्या पार्श्‍वभूमीवर त्यात सहा महिन्यात १८ टक्क्यांची भर पडली आहे. ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीने आयोवातील हे निष्कर्ष डेमोक्रॅट पक्षासाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा दिला आहे. हीच नाराजी कायम राहिली तर डेमोक्रॅट पक्ष संसदेतील बहुमत गमावेल, असे ‘सीएनएन’च्या वृत्तात बजावण्यात आले. आयोवा प्रांतातील सर्वेक्षणापाठोपाठ ‘गॅलप पोल’ या आघाडीच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्षही समोर आले आहेत.

‘गॅलप पोल’च्या सर्वेक्षणानुसार, बायडेन यांना समर्थन देणार्‍यांची संख्या ४३ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. तब्बल ५३ टक्के नागरिकांनी बायडेन यांच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली असून हा बायडेन यांच्या कारकिर्दीतील नीचांक असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

leave a reply