जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवादी चकमकीत ठार

- ७० हॅण्डग्रेनेड, ५ एके-४७ रायफलीसह प्रचंड शस्त्रसाठा जप्त

श्रीनगर – पाकिस्तानातून घुसखोरी करून दाखल झालेल्या तीन दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमच्या उरी सेक्टरमध्ये सुरक्षादलांनी चकमकीत ठार केले. या दहशतवाद्यांकडे ७० हॅण्डग्रेनेड, पाच एके-४७ रायफली, आठ पिस्तूलांसह इतरही मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. त्यांच्याकडे सापडलेला हा शस्त्रसाठा पाहता प्रचंड मोठ्या हल्ल्याची कट उधळला गेल्याचे स्पष्ट होते. सोमवारी हे दहशतवादी नियंत्रण रेषेवरून भारतात घुसले होते, अशी माहिती मिळत आहे. तसेच सुरक्षायंत्रणांची या भागात अजूनही व्यापक शोध मोहिम सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वीच भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षबंदी करार झाला होता. त्यानंतर सीमेपलिकडून करण्यात येणारा गोळीबार थांबला होता. तसेच घुसखोरीच्या घटनाही कमी झाल्या होत्या. मात्र अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येताच पुन्हा एकदा सीमेपलिकडेही दहशतवाद्यांच्या हालचाली पुन्हा एकदा वाढल्याचे दिसत आहे. १८ सप्टेंबर रोजीही नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा मोठा प्रयत्न झाला होता. मात्र तो सुरक्षादलांनी उधळून लावला आहे.

सोमवारीही जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमधून मोठी घुसखोरी झाली. पण या घुसखोरीची सूचना मिळताच सुरक्षादलांनी या भागात मोठी मोहिम हाती घेतली. या भागातील मोबाईल व इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर मोठी शोधमोहिम हाती घेण्यात आली. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान गुरुवारी सुरक्षादलांचे जवान व दहशतवाद्यांचा आमनासामना झाला. येथील रामपूर सेक्टरच्या हथलंगा जंगल क्षेत्रात दहशतवाद्यांच्या हालचाली दिसून आल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती, असे लष्कराच्या १५ कोरचे कमांडिंग ऑफीसर लेफ्टनंट जनरल डी.पी.पांडे यांनी सांगितले.

चकमकीत तीन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले. त्यामुळे घुसखोरीचा आणखी एक प्रयन्न सुरक्षादलांनी उधळून लावला. दहशतवाद्यांकडे प्रचंड प्रमाणात शस्त्र व स्फोटक साठा होता. यामध्ये ७० हॅण्डग्रेनेड, पाच एके-४७ रायफली, आठ पिस्तूलांसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळ्याचा समावेश आहे. तसेच या दहशतवाद्यांकडे औषधे व खाण्यापिण्याचे सामानही सापडले आहेत. त्यामुळे मोठ्या तयारीने व मोठा हल्ला घडविण्याची दृष्टीने ही घुसखोरी झाली होती, असे स्पष्ट होत आहे. दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी रुपयेही आढळले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून लहान शस्त्रांचा वापर वाढला आहे. पिस्तूल लपविणे सोपे असल्याने दहशतवाद्यांकडून या शस्त्राचा वापर वाढला आहे. गोळीबार करून पाळून जाण्याचे किंवा ग्रेनेड हल्ले करून पळ काढण्याची कार्यपद्धती दहशतवाद्यांनी स्वीकारली आहेत. गेल्या काही महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये ८० हून अधिक पिस्तूल जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकार्‍याने दिली.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्येही चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. त्याच्याजवळूनही एक पिस्तूल आणि दारुगोळा सापडला आहे. याशिवाय पंजाबच्या तरण तारणमधूनही तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्र व स्फोटकसाठ्यासह अटक करण्यात आली. गेल्या दीड महिन्यात पंजाबमध्ये पाचव्यांदा असा मोठा शस्त्रसाठा पकडण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये ड्रोनद्वारे पाकिस्तानातून तस्करी करण्यात आलेला टिफीन आयईडीसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

पाच अफगाणी दहशतवादी घुसल्याचा गुप्तचर संस्थेचा इशारा लष्कराच्या छावण्या निशाण्यावर

नवी दिल्ली – अफगाणीस्तानात तालिबानच्या राजवटीनंतर भारतातही दहशतवादी कारवाया वाढतील, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. हा इशारा खरा ठरताना दिसत असून पाकिस्तानातून पाच अफगाणी दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. यानंतर गुप्तचर यंत्रणांनी ऍलर्ट जारी केला आहे. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर लष्करी छावण्या आणि सरकारी कार्यालय असल्याची व काही स्थानिकांकडून त्यांना मदत मिळत असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटल्याचे वृत्त आहे.

गेल्या आठवड्यात उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि भारतीय लष्करामध्ये गोळीबार झाला होता. यामध्ये एक भारतीय जवान जखमी झाला होता. हा गोळीबार पाकिस्तानने दहशतवाद्यांना सहाय्य करण्याकरीताच केला होता. कारण उरी सेक्टरमध्ये अंगूर पोस्ट जवळ एका भागात तारांचे कुंपण कापलेले आढळले आहे. येथूनही पाच अफगाणी दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केल्याचा ऍलर्ट गुप्तचर संस्थांनी सुरक्षा व तपास यंत्रणांना दिला आहे.

पाकिस्तानने या दहशतवाद्यांना घुसखोरीत मदत केली आहे. तसेच या दहशतवाद्यांना स्थानिकांमध्ये मिसळून राहणे कठीण असल्याने जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवादीही त्यांना मदत करीत आहेत. यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मोठी शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. २० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर असतानाही पाकिस्तानातून अफगाणी दहशतवाद्यांना भारतात पाठविले जात होते. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेचा इशारा महत्त्चाचा ठरतो.

leave a reply