दुहेरी उपयोग असलेल्या तंत्रज्ञानाच्या विकासाकडे संशोधकांनी लक्ष पुरवावे

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे आवाहन

नवी दिल्ली – अत्याधुनिक संरक्षण साहित्याच्या विकासासाठी अधिक लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे. भारतात संरक्षण साहित्याच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने स्वीकारलेल्या धोरणांचा उद्योगांनी लाभ उचलावा. त्याचवेळी लष्करी आणि नागरी अशा दोन्ही यंत्रणांना उपयोगी पडतील अशा दुहेरी उपयोगी तंत्रज्ञानाच्या विकासाकडे संशोधकांनी लक्ष पुरवायला हवे, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओचे संशोधकांबरोबर संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना केले.

दुहेरी उपयोग असलेल्या तंत्रज्ञानाच्या विकासाकडे संशोधकांनी लक्ष पुरवावे - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे आवाहनडीआरडीओने आयोजित केलेल्या ‘डेअर टू ड्रिम २.०’ या स्पर्धेच्या विजेत्यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी संरक्षण विषयक वाढती आव्हाने, भविष्यातील संरक्षण गरजा ओळखून संरक्षण क्षेत्रातील उद्योगांनी तयार रहायला हवे ही बाब संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केली.

संरक्षण व अंतराळ क्षेत्राशी संबंधीत तंत्रज्ञान व प्रणालीच्या विकासाला स्टार्ट अप्स, संस्था व तरुण संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१९ साली प्रथम ‘डेअर टू ड्रिम’ स्पर्धेचे आयोजन डीआरडीओतर्फे करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये २२ संशोधकांबरोबर २९ स्टार्टअप अशा एकूण ४० विजेत्यांना पारितोषिके मिळाली. यावेळी देशात नाविण्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘डेअर टू ड्रिम ३.०’ची घोषणाही संरक्षणमंत्र्यांनी केली.

यावेळी बोलताना जगभरातील होणार्‍या प्रचंड घडामोडी आणि वाढत असलेल्या सुरक्षाविषयक आव्हानांकडे राजनाथ सिंग यांनी लक्ष वेधले. जगातील कोणताही देश धोरणात्मक, लष्करी, व्यापारी, आर्थिक स्तरावर होत असलेल्या बदलापासून वेगळा राहू शकत नाही. जगभरात संरक्षण विषयक आव्हाने वाढली आहेत. सीमा वाद, सागरी क्षेत्रातील घडमोडी यामुळे लष्करी उपकरणांची मागणी वाढत असून संरक्षण क्षेत्रातील भारतीय कंपन्यांनी देशांतर्गत संरक्षण उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे, असेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे.दुहेरी उपयोग असलेल्या तंत्रज्ञानाच्या विकासाकडे संशोधकांनी लक्ष पुरवावे - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे आवाहन

संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचा वेग वाढविण्याबरोबर निश्‍चित कालमर्यादेत प्रकल्पपूर्तीकडे लक्ष पुरवायला हवे, असेही संरक्षणमंत्री म्हणाले. केवळ स्थानिक सुरक्षाविषयक गरजा आपल्याला भागवायच्या नाहीत, तर संरक्षण साहित्य व तंत्रज्ञानाची निर्यातही इतर देशांना करायची आहे, याकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लक्ष वेधले.

डीआरडीओने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे हस्तातंरण करण्याचे धोरण हे भारतीय उद्योगांसाठी मधूर फळ ठरेल. तसेच येत्या काळात भारतीय उद्योगही स्वत:च संंशोधन आणि विकासाकडे अधिक लक्ष पुरवतील, असा विश्‍वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला. विशेषत: दुहेरी वापर करता येईल, अशा तंत्रज्ञानाच्या विकासाकडे संशोधक आणि उद्योगांनी लक्ष पुरवावे. लष्करी व नागरी अशा दोन्हीसाठी वापर होणार्‍या तंत्रज्ञानांकडे संरक्षणमंत्र्यांचा रोख होता. नॅनो, क्वांटम कम्प्युटिंग, आर्टीफिशल इंटेलिजन्स (एआय), रोबोटिक तंत्रज्ञान या अत्याधुनिक तंत्रज्ञाकडे विशेष लक्ष पुरवावे, असे राजनाथ सिंग यांनी ठळकपणे सांगितले.

leave a reply