रशियाने आण्विक पाणबुडीतून हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली

मॉस्को – रशियाने सोमवारी आण्विक पाणबुडीतून ‘झिरकॉन’ या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. रशियाच्या संरक्षण विभागाने याची माहिती दिली. गेल्या वर्षभरात रशियाकडून ‘झिरकॉन हायपरसोनिक मिसाईल’ची चाचणी घेण्याची ही तिसरी वेळ आहे. या चाचणीतून रशियाने पुन्हा एकदा हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या बाबतीत असलेले वर्चस्व दाखवून दिल्याचे मानले जाते.

रशियाने आण्विक पाणबुडीतून हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतलीसोमवारी व्हाईट सी सागरी क्षेत्रात तैनात असलेल्या ‘सेव्हेरोड्विन्स्क’ या आण्विक पाणबुडीतून ‘झिरकॉन’ या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. समुद्रात सुमारे ४० मीटर खोलवरून ही चाचणी घेण्यात आली आहे. झिरकॉन क्षेपणास्त्राने ‘बॅरेन्ट्स सी’मधील लक्ष्य यशस्वीरित्या भेदल्याचे संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले. आण्विक पाणबुडीतून घेण्यात आलेली ‘झिरकॉन’ची ही पहिलीच चाचणी होती.

२०१६ साली पहिल्यांदा रशियाने ‘झिरकॉन’ हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करीत असल्याची माहिती उघड केली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरात त्याच्या तीन चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी जुलै महिन्यात रशियन विनाशिकेवरून झिरकॉनची चाचणी घेण्यात आली होती. या क्षेपणास्त्राचा पल्ला एक हजार किलोमीटरचा असून त्याचा वेग ध्वनीच्या तब्बल नऊ पट असल्याचे सांगण्यात येते. रशियाने आण्विक पाणबुडीतून हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतलीया वेगामुळे जगातील कोणतीही ‘मिसाईल डिफेन्स सिस्टिम’ या क्षेपणास्त्राचा वेध घेऊ शकत नाही, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला होता.

रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, झिरकॉन विनाशिका तसेच विमानवाहू युद्धनौकांचा वेध घेण्यास सक्षम असल्याचे सांगण्यात येते. जुलै महिन्यात झालेल्या चाचणीनंतर रशियन संरक्षणदलाने युद्धनौकांवर ही हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तैनात करण्याबाबत करारही केला होता. आता पाणबुडीतून झालेल्या चाचणीनंतर झिरकॉन रशियन पाणबुड्यांवरही तैनात करण्यात येतील, असे संकेत मिळत आहेत. दोन वर्षांपूर्वी रशियाने ‘ऍव्हनगार्ड’ ही हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आपल्या संरक्षणदलात तैनात केली होती.

अमेरिकेसह नाटो देशांनी रशियाच्या वाढत्या हायपरसोनिक क्षेपणास्त्र क्षमतेवर चिंता व्यक्त केली असून ही क्षेपणास्त्रे पाश्‍चात्य यंत्रणांसाठी धोकादायक ठरु शकतात, असे बजावले आहे.

leave a reply