जॉर्डनच्या राजवटीविरोधातील बंड उधळले

- प्रिन्स हमझा नजरकैदेत तर बंडखोर अधिकार्‍यांची धरपकड

अम्मान – जॉर्डनच्या राजघराण्यात फार मोठ्या उलथापालथी सुरू झाल्या आहेत. शनिवारी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांच्या हातून सत्ता हिरावून घेण्याचा कट प्रिन्स हमझा बिन हुसेन यांनी आखला होता. परदेशी हस्तकांच्या सहाय्याने जॉर्डनची सुरक्षा धोक्यात टाकण्याचे षडयंत्र प्रिन्स हमझा यांनी आखले होते, असा आरोप जॉर्डनचे परराष्ट्रमंत्री अयमन सफादी यांनी केला. तर प्रिन्स हमझा बिन हुसेन यांचा एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध झाला असून यात त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे आरोप केले आहेत. तसेच जॉर्डनमधील राजवट राज्यकारभार चालवण्यात अकार्यक्षम व भ्रष्ट असल्याची टीकाही प्रिन्स हमझा यांनी या व्हिडिओतून केली आहे.

सिरिया, इराक, सौदी अरेबिया, इस्रायल आणि वेस्ट बँक यांच्यामध्ये असलेला जॉर्डन अरब-आखाती देश आहे. दोन दशकांपूर्वी अमेरिकेबरोबर मुक्त व्यापारी करार करणारा जॉर्डन हा पहिला अरब देश ठरला होता. या देशाची अर्थव्यवस्था उद्योगक्षेत्र आणि पर्यटनावर अवलंबून आहे. राजेशाही व्यवस्था असलेल्या जॉर्डनचे आत्तापर्यंतचे धोरण उदार राहिले असून इस्रायला मान्यता देणार्‍या देशांमध्ये इजिप्तनंतर जॉर्डनने पुढाकार घेतला होता. मात्र आता या देशाच्या राजघराण्यातील सत्तास्पर्धा तीव्र बनल्याचे उघड झाले असून शनिवारी झालेला बंडाचा प्रयत्न याची साक्ष देत असल्याचे पाश्‍चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे.

२००४ सालापर्यंत प्रिन्स हमझा जॉर्डनचे क्राऊन प्रिन्स म्हणून नियुक्त होते. प्रिन्स हमझा यांची जॉर्डनमध्ये लोकप्रिय असल्याचे मानले जाते. जॉर्डनमध्ये सध्या भ्रष्टाचार बोकाळल्याची टीका प्रिन्स हमझा यांनी केली होती. शनिवारी देखील प्रिन्स हमझा यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून सत्ताधारी यंत्रणा अकार्यक्षम आणि भ्रष्ट असल्याचा आरोप केला. तसेच आपल्या संचार आणि संपर्कावर बंधने लादण्यात आल्याचा ठपका प्रिन्स हमझा यांनी या व्हिडिओमध्ये केला.

राजघराण्याचा सदस्य म्हणून पुरविण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली असून आपली इंटरनेट सेवाही तोडल्याचे प्रिन्स हमझा यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी राजे अब्दुल्ला दुसरे यांच्यावर टीका करणार्‍या एका बैठकीत मी हजर होतो. त्यामुळे ही कारवाई झाल्याची माहिती लष्करी अधिकार्‍यांनी मला दिली, असे प्रिन्स हमझा यांनी या व्हिडिओत सांगितले. तसेच जॉर्डनची सत्ताधारी यंत्रणा वैयक्तिक व आर्थिक हितसंबंधांना सर्वाधिक महत्त्व देत आहे व जनतेच्या गरजांना किंमत देत नसल्याचा आरोप प्रिन्स हमझा यांनी केला.

जॉर्डनचे परराष्ट्रमंत्री अयमन सफादी यांनी प्रिन्स हमझा यांच्यावरील कारवाईचे कारण स्पष्ट केले. प्रिन्स हमझा व इतर १४ जणांनी राजवट उलथण्याचा कट रचला होता. यासाठी प्रिन्स हमझा व अटकेत असलेल्या नेत्यांनी परकीय शक्तींचे सहाय्य घेतले होते. प्रिन्स हमझा यांच्या पत्नीला अन्य देशात आश्रय मिळवून देण्याची तयारीही सुरू झाली होती, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सफादी यांनी दिली. या प्रकरणी राजघराण्याचे सदस्य शरीफ हसन बिन झईद तसेच माजी अर्थमंत्री बासेम इब्राहिम अवादालाह यांनी पुढाकार घेतला होता, असे सफादी यांनी स्पष्ट केले.

जॉर्डनमधील या उलथापालथींवर जगभरातून प्रतिक्रिया आल्या आहेत. या काळात आपण जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांच्या पाठिशी असल्याची प्रतिक्रिया अमेरिका, सौदी अरेबिया, युएई, बाहरिन, कतार, कुवैत, इजिप्त, इराक, ओमान, लेबेनॉन तसेच अरब लीग आणि गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलने दिली आहे. तर शेजारी देश असलेल्या इस्रायलने जॉर्डनमधील घडामोडींवर चिंता व्यक्त केली. तर परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे जॉर्डनच्या यंत्रणांनी इस्रायलला कळविले आहे.

leave a reply