पाश्चिमात्यांच्या निर्बंधांनंतरही रशियाच्या परकीय गंगाजळीत वाढ

बँक ऑफ रशियाची माहिती

मॉस्को – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देश रशियावर एकापाठोपाठ एक निर्बंधांचा मारा करीत आहेत. या निर्बंधांमुळे रशियाची अर्थव्यवस्था खिळखिळी होऊन रशियन राजवट युक्रेनमधील हल्ले थांबविल, असा दावा पाश्चिमात्य देश करीत होते. मात्र प्रत्यक्षात पाश्चिमात्यांचे निर्बंधांचे शस्त्र निरर्थक ठरल्याची माहिती समोर येत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच रशियाची परकीय गंगाजळी पुन्हा 600 अब्ज डॉलर्सच्या नजिक पोहोचल्याची माहिती रशियाच्या मध्यवर्ती बँकेने दिली.

Ten Thousand Yuanजानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात रशियाच्या परकीय गंगाजळीत 0.5 टक्क्यांची भर पडली आहे. त्यानंतर रशियाची एकूण परकीय गंगाजळी 597. 7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. यात सोन्यातील गुंतवणूक आणि देशात तसेच परदेशात असलेल्या परकीय चलनाचा समावेश आहे. सध्या रशियाच्या गंगाजळीत सर्वाधिक हिस्सा युरो चलनाचा असून त्यापाठोपाठ 20 टक्क्यांहून अधिक हिस्सा सोन्याचा आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस युक्रेनविरोधात संघर्ष छेडल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियाची परदेशातील गंगाजळी गोठविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रशियाची 40 टक्क्यांहून अधिक गंगाजळी गोठविण्यात आली आहे. त्यानंतर रशियाच्या गंगाजळीला मोठा फटका बसून रशियन अर्थव्यवस्था कोसळेल, असे दावे पाश्चिमात्य अधिकारी व यंत्रणांकडून करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात रशियाला इंधनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात परकीय गंगाजळी मिळाल्याचे समोर आले आहे. रशियाच्या मध्यवर्ती बँकेने दिलेली माहिती त्याला दुजोरा देणारी दिसत आहे.

leave a reply