इराणच्या मुद्यावर युरोपचा इस्रायलला पाठिंबा आहे

इस्रायलच्या पंतप्रधानांची घोषणा

जेरूसलेम – इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्याच्या मुद्यावर युरोपिय देशांचा इस्रायलला पाठिंबा आहे, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केली. इस्रायलच्या पंतप्रधानांनी रविवारच्या कॅबिनेट बैठकीत फ्रान्सचा दौरा व युरोपिय नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेची माहिती दिली. आपल्या अणुकार्यक्रमाचा वेग तीव्र करणाऱ्या इराणला हा इशारा असल्याचा दावा केला जातो.

netanyahuगेल्या आठवड्यात इस्रायलच्या पंतप्रधानांनी फ्रान्सचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट घेतली होती. इराणच्या अणुकार्यक्रमाचे विघातक परिणाम संभवतात, असा इशारा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी यावेळी दिला होता. यानंतर पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी युरोपच्या इतर नेत्यांबरोबरही चर्चा केल्याचा दावा केला जातो. युरोपिय मित्रदेशांच्या नेत्यांबरोबर झालेल्या या चर्चेची माहिती कॅबिनेटच्या बैठकीत देताना इराणच्या मुद्यावर इस्रायलला युरोपिय देशांचे समर्थन असल्याचे जाहीर केले.

काही तासांपूर्वी आंतरराष्ट्रीय ऊर्जा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात इराणच्या फोर्दो अणुप्रकल्पात मर्यादेपलिकडे युरेनियमचे संवर्धन व सेंट्रिफ्यूजेसची मांडणी सुरू असल्याचा इशारा दिला. अमेरिका व युरोपिय देशांनी या अहवालाचा आधार घेऊन इराणला फटकारले होते. तर इराणवरील छुप्या हल्ल्याबाबत अमेरिका व इस्रायलमध्ये एकमत असल्याची बातमी दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाली होती. इस्रायलने इराणमधील तीन हजार टार्गेट्स निश्चित केल्याचेही समोर आले होते. या पार्श्वभूमीवर, युरोपिय देशांचा इस्रायलला मिळालेला पाठिंबा इराणसाठी इशारा ठरतो.

leave a reply