कोरोनाचा धोका अधिकच वाढला

जगभरातील कोरोनाच्या बळींची संख्या २,१२,००० च्याही वर

वॉशिंग्टन/मॉस्को – जगभरात कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या २,१२,६६५ वर पोहोचली असून एकट्या अमेरिकेत या साथीने ५६,१४४ जणांचा बळी घेतला आहे. या साथीचा जबर फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसत असून उद्योगक्षेत्रांचे जबर नुकसान होत आहे. यामुळे काही देशांनी लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. न्यूझिलँडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी तर कोरोनाव्हायरस विरोधी लढ्यात विजय मिळविल्याचे सांगून देशातील लॉकडाउन मागे घेतला आहे.

गेल्या चोवीस तासात या साथीने जगभरात साडेसहा हजार जणांचा बळी घेतला आहे. यात अमेरिकेतील १३०३ बळींचा समावेश आहे. अमेरिकेत या साथीने एकूण ५६,१४४ जण दगावले असून यात अमेरिकेच्या संरक्षणदलातील २७ सैनिकांचा समावेश असल्याची बातमी समोर येत आहे. तर या साथीच्या अमेरिकेतील रुग्णांची संख्या १० लाखांच्या वर गेली आहे. या साथीच्या जगभरातील एकूण रुग्णांपैकी जवळपास ३० टक्के रुग्ण अमेरिकेत आहेत.

अशा परिस्थितीत अमेरिकेतील काही प्रांतांनी लॉकडाउन मागे घेण्यास सुरुवात केली आहे. आपल्या प्रांतात कोरोनाच्या साथीच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचे या प्रांतांनी म्हटले आहे. पण फार मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने अमेरिकेतील हे प्रांत लॉकडाउन मागे घेत असल्याचे दिसते. मात्र अमेरिकेचे आर्थिक इंजिन असलेल्या आणि गेल्या महिन्याभरापासून या साथीचे केंद्र ठरलेल्या न्यूयॉर्क प्रांताने लॉकडाउन मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. न्यूयॉर्क प्रांतात या साथीने १७,३०० जणांचा बळी घेतला असून सुमारे तीन लाख रुग्ण आढळले आहेत.

ब्रिटनमध्ये पुन्हा एका दिवसात पाचशेहून अधिक जणांचा बळी गेला आहे. जॉन हॉप्किन्स विद्यापीठ आणि ब्रिटीश आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात ६३३ जण या साथीने दगावले आहेत. ब्रिटनमधील या साथीच्या एकूण बळींची संख्या २१,७४९ वर पोहोचली असून या देशात कोरोनाचे एकूण १,५७,१४९ रुग्ण आहेत. या साथीचा जगभरातील इंधन कंपन्यांना जबर फटका बसला असून ‘ब्रिटीश पेट्रोलियम’ या इंधन कंपनीला गेल्या तिमाहित ४.४ अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले आहे.

या साथीने इटलीमध्ये जवळपास २७ हजार आणि स्पेनमध्ये सुमारे २४ हजार जणांचा बळी गेला आहे. गेल्या चोवीस तासात इटलीमध्ये या साथीचे ३३३ तर स्पेनमध्ये ३०१ जणांचे बळी गेले आहेत. फ्रान्समधील या साथीच्या बळींची संख्या कमी झाली असली तरी देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. यापार्श्वभूमीवर फ्रान्सचे पंतप्रधान एडवर्ड फिलिप यांनी ११ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्याची घोषणा केली आहे.

कोरोनाव्हायरसचे ९३ हजार रुग्ण असलेल्या रशियातील परिस्थिती देखील दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जाहीर केले. मंगळवारी रशियन पत्रकारांशी बोलताना, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपला देश कठीण काळातून प्रवास करणार असल्याचे बजावले. तसेच पुढील दोन आठवड्यांसाठी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जनतेला केली आहे.

leave a reply