देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३० हजारावर

- मुंबईत चोवीस तासात २५ जण दगावले

नवी दिल्ली/मुंबई – चोवीस तासात देशातील कोरोनाच्या बळींची संख्या ५१ ने वाढून ९३७ वर पोहोचली आहे. तर सुमारे १६०० नवे रुग्ण आढळल्याने देशातील एकूण रुग्णांची संख्या ३० हजाराच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात विशेतः मुंबई आणि पुण्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी मुबंईत दिवसभरात २५ जण या साथीने दगावले. एकाच दिवसात प्रथमच मुंबईत कोरोनामुळे इतके जण दगावले आहेत.

आढळणारे रुग्ण आणि मृत्यू दराच्या बाबतीत जगात या साथीचा फटका बसलेल्या इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे, असे पुन्हा एकवार आरोग्य मंत्रालयातर्फ़े स्पष्ट करण्यात आले. भारतात रुग्ण बरे होण्याचा दर २३.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच २८ दिवसात एकही रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यांमध्ये आणखी १७ जिल्ह्यांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

मात्र आरोग्य विभागाकडून हे दावे करण्यात येत असतानाच देशातील काही भागात या साथीच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मुंबईत चोवीस तासात २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. मंगळवारी मुंबईत दगावलेल्यांपैकी १४ जण हे ४० वर्षाखालील आहेत. तसेच मुंबईत दिवसभरात ३९४ नवे रुग्ण आढळले. धारावी सारख्या दाटीवाटीच्या भागात ४२ नवे रुग्ण सापडले, तर चार जण या साथीने दगावले. त्यामुळे धारावीतील या एकूण रुग्णांची संख्या ३३० झाली आहे, तर आतापर्यंत धारावीतील १८ जणांचा बळी गेला आहे. मुंबईत आतापर्यंत २४४ जण या साथीचे बळी ठरले आहेत.

मंगळवारी पुण्यात कोरोनाव्हायरसमुळे तीन जण दगावले, तर १४३ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे या शहरातील या साथीने दगावलेल्यांची संख्या ८३ झाली असून एकूण रुग्णांची संख्या सुमारे १५०० पर्यंत पोहोचली आहे. गुजरात आणि दिल्लीतही काही भागात रुग्ण वेगाने वाढत आहेत. मुंबईनंतर गुजरातच्या सुरत आणि वडोदरामध्ये चोवीस तासात सर्वाधिक रुग्ण दगावले आहेत. मंगळवारी सुरतमध्ये १९, तर वडोदरात १३ रुग्णांचा या साथीने मृत्यू झाला.

दरम्यान प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार होत आहेत, असे अजूनही कोणते पुरावे मिळालेले नाहीत. अद्याप यावर संशोधन सुरु आहे. त्यामुळे परवानगीशिवाय प्लाझ्मा थेरपी उपचारासाठी वापरली जाऊ नये, हे रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते, असे आरोग्य मंत्रालयाने बजावले आहे.

leave a reply