युक्रेनकडून रशिया नियंत्रित डोनेत्स्क शहरावर रॉकेट हल्ले

आठ वर्षातील सर्वात मोठा हल्ला असल्याचा दावा

donetsk shellingकिव्ह – युक्रेनी लष्कराने रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या डोनेत्स्क शहरावर गुरुवारी मोठा हल्ला चढविला. या हल्ल्यात रॉकेट्स व तोफांचा वापर करण्यात आला. युक्रेनने या शहरावर चढविलेला २०१४ सालानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याची माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, रशिया २०२३च्या सुरुवातील युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला करील असा इशारा युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिला.

Kherson-Mykolaiv Battle Mapगुरुवारी पहाटेच्या सुमारास युक्रेनी लष्कराने डोनेत्स्क शहरात रॉकेट्सचा जोरदार मारा सुरू केला. शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू केलेल्या या हल्ल्यांमध्ये शाळा, घरे तसेच कार्यालयांना लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यांसाठी ‘ग्रॅड रॉकेट्स’चा वापर करण्यात आल्याचे रशियाने म्हटले आहे. युक्रेनने जवळपास ४०हून अधिक रॉकेट्स डागली. त्यानंतर तोफा, रणगाडे तसेच मॉर्टर्सच्या सहाय्यानेही हल्ले करण्यात आल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.

या हल्ल्यात शहरातील अनेक जण जखमी झाले असून जीवितहानी झालेली नाही, असे रशियन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. २०१४ साली रशियासमर्थक सशस्त्र गटांनी डोनेत्स्क प्रांताची राजधानी असणारे डोनेत्स्क शहर ताब्यात घेतले होते. त्यानंतर शहरावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याची माहिती रशियाने दिली.

दरम्यान, रशियाला युक्रेनमधील संघर्ष दीर्घकाळ लांबवायचा असून २०२३च्या सुरुवातीला रशिया पुन्हा युुक्रेनवर मोठा हल्ला करील, असा दावा युक्रेनच्या लष्कराचे प्रमुख जनरल व्हॅलरी झालुझ्नी यांनी केला. रशियन फौजा यासाठी सज्ज होत असल्याचेही युक्रेनी अधिकाऱ्यांनी पुढे स्पष्ट केले.

leave a reply