अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रशियाविरोधात आफ्रिकी देशांचे समर्थन मिळविण्यात अपयशी

आफ्रिकी देशांचेवॉशिंग्टन – आपल्या वाढत्या हस्तक्षेपाद्वारे रशिया आफ्रिकी देशांमध्ये अस्थैर्य निर्माण करीत आहे. आफ्रिकेचे भविष्य अमेरिकेवर अवलंबून आहे, असे आवाहन करून अमेरिकेने आफ्रिकी देशांचे रशियाविरोधी समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आफ्रिकी देशांमध्ये 15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षज ज्यो बायडेन यांनी जाहीर केले. पण आफ्रिकी देश अमेरिकेकडे विश्वासू सहकारी देश म्हणून पाहत नाहीत. त्यामुळे रशियाविरोधात आफ्रिकी देशांचे समर्थन मिळविण्यात बायडेन प्रशासन अपयशी ठरल्याचा दावा अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्रांनी केला.

बायडेन प्रशासनाने आफ्रिकेतील 50 देशांच्या नेत्यांना वॉशिंग्टमध्ये आमंत्रित करून तीन दिवसांची ‘युएस-आफ्रिका लिडर्स समीट’ आयोजित केली आहे. आफ्रिकी देशांसमोर अमेरिका किंवा रशिया यापैकी एका देशाची निवड करा, असा पर्याय ठेवण्याचे बायडेन प्रशासनाने टाळले. पण या बैठकीच्या निमित्ताने बायडेन प्रशासनाने रशिया तसेच चीनवर मोठे आरोप केले.

बैठकीच्या पहिल्याच दिवशी आफ्रिकी नेत्यांना संबोधित करताना अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी रशिया व चीन आफ्रिकेला अस्थिर करीत असल्याचा ठपका ठेवला. चीन दरदिवशी आपल्या आर्थिक प्रभावाअंतर्गत आफ्रिकी देशांमध्ये पाय रोवत आहे. तर रशिया या देशांना स्वस्त शस्त्रास्त्रे पुरवून आणि कंत्राटी जवानांना तैनात करून आफ्रिकेतील अस्थैर्यात भर टाकत आहेत, असा आरोप ऑस्टिन यांनी केला.

यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आफ्रिकी देशांसाठी 15 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक जाहीर केली. आफ्रिकेच्या विकासासाठी अमेरिका पूर्णपणे वचनबद्ध असून आफ्रिकेचे भविष्य अमेरिकेवर अवलंबून असल्याचा दावा बायडेन यांनी केला. याद्वारे बायडेन प्रशासनाने आफ्रिकी देशांना रशियाविरोधी आघाडीत सामील करण्याचा प्रयत्न केला. पण बायडेन प्रशासन या प्रयत्नात अपयशी ठरल्याचा दावा अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्रांनी केला.

आफ्रिकी देश बायडेन प्रशासनाबाबत द्विधा मन:स्थितीत अडकलेले असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. तर आफ्रिकी देश अमेरिकेकडे विश्वासू सहकारी देश म्हणून पाहत नसल्याचा दावा द हिल या वर्तमानपत्राने केला.

हिंदी

leave a reply