रशियाकडून चीनवर हेरगिरीचा आरोप – आर्क्टिकमधील वैज्ञानिक व्हॅलरी मिटको यांना अटक

मॉस्को/बीजिंग – चीनने हेरगिरीच्या माध्यमातून रशियन वैज्ञानिकांकडून संवेदनशील माहिती मिळविल्याचा आरोप रशियन सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. या प्रकरणी आर्क्टिक क्षेत्रात कार्यरत असलेले रशियाचे वरिष्ठ वैज्ञानिक व्हॅलरी मिटको यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप ठेवण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षात चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या रशियन वैज्ञानिकांना अटक होण्याची ही दुसरी घटना आहे. रशिया हा चीनचा सर्वात जवळचा मित्रदेश म्हणून ओळखण्यात येतो. असे असतानाही चीनची हेरगिरी व रशियाकडून त्यावर होणारी कारवाईची घटना दोन देशांमधील संबंधांमध्ये असलेला तणाव दाखवून देणारी आहे.

रशिया, चीन, हेरगिरी

गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेविरोधात रशिया-चीनची आघाडी आकारास येत असल्याचे चित्र दिसत आहे. अर्थ, व्यापार व सामरिक क्षेत्रात दोन देशांनी परस्परांमधील भागीदारी अधिक दृढ होईल असे अनेक निर्णय घेतले होते. रशिया व चीनने अनेक जागतिक मुद्द्यांवर एकत्र येऊन परस्परांच्या भूमिकेचे जोरदार समर्थनही केले आहे. मात्र त्याचवेळी चीनकडून रशियन तंत्रज्ञानाची होणारी चोरी आणि हेरगिरीच्या घटनांनी दोन देशांमधील तणावही सातत्याने समोर येत राहिला आहे.

रशिया, चीन, हेरगिरी

आर्क्टिकमधील रशियन वैज्ञानिक व्हॅलरी मिटको यांच्या अटकेने या तणावपूर्ण संबंधांना दुजोरा मिळाल्याचे दिसते. रशियाच्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’ने व्हॅलरी मिटको यांच्यावर, पाणबुडीचा शोध घेण्यासंदर्भातील तंत्रज्ञानाची गोपनीय माहिती चीनला पुरविल्याचा आरोप ठेवला आहे. २०१८ साली चीनला दिलेल्या एका भेटीत त्यांनी ही गोपनीय माहिती चीनला दिली असे रशियन यंत्रणेने आपल्या आरोपांमध्ये म्हटले आहे. ‘आर्क्टिक अकॅडमी ऑफ सायन्सेस’चे प्रमुख असणाऱ्या ७८ वर्षीय व्हॅलरी मिटको यांनी चीनच्या स्पेशल सर्व्हिसेसला पैशांच्या बदल्यात गोपनीय माहिती पुरवल्याचेही रशियन यंत्रणेने स्पष्ट केले.

रशिया, चीन, हेरगिरी

गेल्या चार वर्षात रशियन वैज्ञानिकांनी चीनसाठी हेरगिरी केल्याचे उघड होणारी ही दुसरी घटना आहे. २०१६ साली रशियन अंतराळ वैज्ञानिक व्लादिमिर लॅपिगिन यांना, चीनला हायपरसोनिक विमानाच्या तंत्रज्ञाना संदर्भातील गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. रशियाकडून चीनला पुरविण्यात येणारी अत्याधुनिक लढाऊ विमाने व संरक्षण यंत्रणांचे तंत्रज्ञान तसेच आराखडे यांचीही चीन नक्कल करीत असल्याचे आरोप रशियाकडून करण्यात आले आहेत.

दरम्यान, सोमवारी रशियातील न्यायालयाने पॉल व्हेलन या अमेरिकी नागरिकाला हेरगिरीच्या आरोपाखाली १६ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, या निर्णयावर टीका केली असून ही शिक्षा तीव्र चिंताजनक घटना असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेतील गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या काही रशियन नागरिकांच्या बदल्यात व्हेलन यांची सुटका होऊ शकते असे संकेत रशियातील सूत्रांनी दिले आहेत.

leave a reply