जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ८० लाखांवर

वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाच्या साथीचा संसर्ग झालेल्यांमध्ये सातत्याने भर पडत असून ही संख्या ८० लाखांवर जाऊन पोहोचली आहे. कोरोनाव्हायरसमुळे बळी गेलेल्यांची संख्या ४ लाख ३६ हजारांवर गेली आहे. अमेरिका व ब्राझीलपाठोपाठ आता रशियामध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून ती पाच लाख ३५ हजारांवर गेली आहे. त्याचवेळी गेल्या २४ तासांमध्ये ८२ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या

‘वर्ल्डओमीटर’ या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८०,५०,३७७ झाली असून गेल्या २४ तासांमध्ये त्यात १,२५,०१३ जणांची भर पडली आहे. कोरोनाच्या साथीमुळे २४ तासात ३,१८७ जण दगावले असून एकूण बळींची संख्या ४,३६,६१० वर पोहोचली आहे. कोरोनाच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१,५५,५०६ झाली असून २४ तासांमध्ये त्यात ८२,९२० जणांची वाढ झाली आहे.

अमेरिकेत १९,६६९ रुग्णांची भर पडली असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या २१,७०,१५६ झाली आहे. साथीत बळी गेलेल्यांची एकूण संख्या १,१७,९५१ झाली असून २४ तासात त्यात ३६० जणांची भर पडली. अमेरिकेत सलग दोन दिवस कोरोना बळीचा आलेख खाली घसरत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

ब्राझिलमध्ये बळींची एकूण संख्या ४३,३९६ झाली असून २४ तासांमध्ये ५५९ जण दगावले आहेत. रशियात ८,२४६ नव्या रुग्णांची भर पडली असून कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या ५,३७,२१० झाली आहे. रशियात गेल्या २४ तासांमध्ये १४३ बळी गेले असून कोरोना साथीमुळे दगावलेल्यांची एकूण संख्या ७,०९१ झाली आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन उठवून कारखाने, पर्यटन, हवाईसेवा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अमेरिका व युरोपियन देशांनी यासाठी पावले उचलली असून ग्रीसने आपण पर्यटनासाठी खुले असल्याची घोषणा केली आहे. जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, बेल्जियम, स्पेन यांनीही आपल्या सीमा खुल्या करीत असल्याचे जाहीर केले.

leave a reply