चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांना रशियाकडून अटक

मॉस्को – युक्रेनच्या युद्धाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले असताना रशियामध्ये हेरगिरीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. रशियाचा मित्रदेश असलेला चीनच हेरगिरी करीत असल्याचे समोर आले आहे. चीनच्या गुप्तचर यंत्रणेला लेझर तंत्रज्ञानाविषयी गोपनीय माहिती पुरविणाऱ्या शास्त्रज्ञाला रशियन यंत्रणांनी ताब्यात घेतले. तर काही तासांपूर्वी हायपरसोनिक तंत्रज्ञानाची तस्करी करणाऱ्या आणखी एका संशोधकाला रशियन गुप्तचर यंत्रणेने अटक केली आहे.

Anatoly-Maslovगेल्या काही दिवसांपासून रशियामध्ये संशयास्पद घटना सुरू आहेत. रशियाच्या अतिसंवेदनशील ठिकाणी स्फोटाच्या किंवा आग भडकण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर रशियन सुरक्षा यंत्रणांनी विदेशी हेर व त्यांच्या एजंट्सना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच अंतर्गत बंडखोरी घडविणाऱ्यांवरही कारवाई सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर, पाश्चिमात्य देश रशियामध्ये बंडखोरी घडविण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा केला जातो. ही कारवाई सुरू असताना चीनसाठी हेरगिरी करणारे देखील पकडले जात आहेत.

चार दिवसांपूर्वी रशियन गुप्तचर यंत्रणा ‘एफएसबी’ने सैबेरिया प्रांतातून दिमित्री कोलकेर यांना ताब्यात घेतले. नोवोसिबिस्क विद्यापीठात भौतिक आणि गणित या विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक असलेले कोलकेर हे लेझर तंत्रज्ञानाचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. रशियन यंत्रणांनी कोलकेर यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला आहे. कोलकेर यांनी देशाचे लष्करी तंत्रज्ञान चिनी सुरक्षा यंत्रणेला तस्करी केल्याचा ठपका रशियाने ठेवला आहे. कोलकेर यांना ताब्यात घेऊन लेफोर्तोव्हो कारागृहात ठेवण्यात आले होते. पण काही तासांपूर्वीच कोलकेर यांचा संशयास्पद मृत्यू झाला. यामागील कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Dmitry Kolker1_Pratyakshaरशियन सुरक्षा यंत्रणांनी कोलकेर यांचे निकटवर्तीय संशोधक ॲनातोली मास्लोव्ह यांनाही अटक केली होती. हायपरसोनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक असलेले मास्लोव्ह व कोलकेर चीनला लष्करी तंत्रज्ञानाची तस्करी करीत असल्याचा आरोप रशियाने केला आहे. मास्लोव्ह यांना देखील लेफोर्तोव्हो कारागृहातच ठेवले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये रशियामध्ये हेरगिरीचे मोठे जाळे समोर आले आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यात हायपरसोनिक संशोधन प्रयोगशाळेचे संचालक अलेक्झांडर कुरानोव्ह यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. कुरानोव्ह अमेरिकेला गोपनीय माहिती पुरवित असल्याचा आरोप झाला होता. तर एप्रिल महिन्यात वॅलेरी गोलुब्किन आणि ॲनातोली गुर्बानोव्ह यांना ताब्यात घेण्यात आले होते. या दोघांवरही लष्करी तंत्रज्ञानाची तस्करी करण्याचे आरोप झाले होते. पण गेल्या काही आठवड्यांपासून चिनी हेर व एजंट्सविरोधात रशियाने कारवाई हाती घेतली आहे. रशियाच्या लष्करी तंत्रज्ञानाची हुबेहूब नक्कल मारण्याचे प्रकार चीनने याआधी केले होते.

leave a reply