पाश्चिमात्यांच्या ‘जी7’ला पर्याय म्हणून रशिया-चीन ब्रिक्सची उभारणी करीत आहेत

-जर्मनीच्या वर्तमानपत्राचा इशारा

बर्लिन – जगातील सर्वाधिक प्रमाणात विकसित व श्रीमंत देशांचा सहभाग असलेल्या ‘जी7′ देशांची बैठक नुकतीच जर्मनीमध्ये पार पडली. या बैठकीत युक्रेनचे युद्ध आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा पार पडली. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात थेट युद्धाचा सामना करीत असलेल्या युरोपिय देशांवर आलेल्या संकटाचे निवारण करण्यात जी7ला तितकेसे यश मिळालेले नाही. ही बाब अधोरेखित करून एका जर्मन वृत्तपत्राने पाश्चिमात्यांच्या जी7चा पर्याय चीन व रशियाकडून उभारला जात असल्याचा दावा केला आहे.

BRICS‘फ्रँकफुर्टर अल्गेमानयने झिटुंग’ असे नाव असलेल्या या वर्तमानपत्राने जी7च्या विरोधात चीन व रशियाने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे बजावले आहे. या देशांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या ब्रिक्स संघटनेचा प्रभाव वाढत चालला आहे. ही संघटना जी7ला पर्याय म्हणून उभी करण्यासाठी रशियाने आपल्या प्रयत्नांचा वेग दुपटीने वाढविला आहे, असा इशारा या जर्मन वर्तमानपत्राने दिला. गेल्याच आठवड्यात ब्रिक्सची बैठक पार पडली होती. त्यानंतर रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिआ झकारोव्हा यांनी लक्षवेधी घोषणा केली. अर्जेंटिना व इराण हे देश देखील ब्रिक्समध्ये सहभागी होण्यास तयार असल्याचे झकारोव्हा म्हणाल्या होत्या, याकडे सदर वर्तमानपत्राने लक्ष वेधले.

रशियन परराष्ट्र मंत्रालयाची ही घोषणा दुर्लक्षित करता येण्याजोगी नाही, याची जाणीव या वर्तमानपत्राने करून दिली. सध्या जी7 म्हणून ओळखली जाणारी ही अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान या देशांची संघटना काही वर्षांपूर्वी ‘जी8′ अर्थात आठ सदस्यदेशांची होती. पण रशियाने युक्रेनवर हल्ला चढवून क्रिमिआच्या भूभागाचा ताबा घेतला आणि त्यानंतर ‘जी8’मधून रशियाला बाहेर पडावे लागले होते. यानंतर जी7 बनलेल्या या संघटनेला आव्हान देण्याची तयारी रशियाने केली होती. रशियासह भारत, चीन, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश असलेले ब्रिक्स संघटन म्हणजे रशियाच्या या महत्त्वाकांक्षेचा भाग आहे, असे सदर वर्तमानपत्राने म्हटले आहे.

G7फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस रशियाने युक्रेनवर हल्ला चढविल्यानंतर, पाश्चिमात्य देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियाने आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका खंडातील देशांबरोबरील आपले सहकार्य मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. ब्रिक्सचा विस्तार हा रशियाच्या जी7ला आव्हान देण्याच्या योजनेचा भाग आहे. रशियाचे संसद सदस्य ॲलेक्सी पुश्कोव्ह यांनी ब्रिक्सबाबत बोलताना ही संघटना जी7 पर्याय ठरू शकेल, असा विश्वास व्यक्त केला होता. यात पाश्चिमात्य देशांचा समावेश नाही, ही बाब अतिशय महत्त्वाची ठरते, याकडे पुश्कोव्ह यांनी लक्ष वेधले होती, याचीही नोंद जर्मनीच्या वर्तमानपत्राने केली आहे.

इराण व अर्जेंटिना हे देश ब्रिक्समध्ये सहभागी होण्याची तयारी करीत आहेतच. त्यापाठोपाठ मेक्सिको, तुर्की आणि सौदी अरेबियाही ब्रिक्समध्ये सहभागी होऊ शकतील, असा दावा जर्मनीच्या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीचा दाखला देऊन रशियाच्या वृत्तसंस्थेने केला आहे.

leave a reply