रशियाचे चलन रुबल लवकरच सोन्याशी जोडले जाईल

- नॅशनल सिक्युरिटी काउंन्सिलच्या सचिवांची घोषणा

चलन रुबलमॉस्को  – रशियाचे चलन रुबल लवकरच सोने व इतर प्रमुख वस्तूंशी जोडले जाईल, अशी साऱ्या जगाचे लक्ष खेचून घेणारी घोषणा रशियाच्या ‘नॅशनल सिक्युरिटी काउंसिल’चे सचिव निकोलाय पत्रुशेव्ह यांनी केली. रशियातील तज्ज्ञ यासंदर्भातील योजनेवर काम करीत असल्याचेही पत्रुशेव्ह म्हणाले. रशियाच्या मध्यवर्ती बँकेकडे सध्या दोन हजार टन राखीव सोने आहे. रशिया हा सोन्याचे उत्पादन करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर 2021 साली रशियातील सोन्याचे उत्पादन 300 टनांवर गेले होते. त्यामुळे रशियाने केलेल्या या घोषणेचे जबरदस्त पडसाद जगभरात उमटणार आहेत.

युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व मित्रदेशांनी रशियावर जबर आर्थिक निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांद्वारे रशियाचे चलन रुबलसह संपूर्ण अर्थव्यवस्थेला लक्ष्य करण्यात आले आहे. यातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रशियाच्या मध्यवर्ती बँकेने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. गेल्या महिन्यात ‘बँक ऑफ रशिया’ने एक ग्रॅम सोन्यासाठी पाच हजार रुबल अशी किंमत निश्चित करून सोन्याची खरेदी सुरू केली होती. त्यामुळे रुबलची मागणी वाढून त्याचे मूल्य स्थिर होण्यास सुरुवात झाली होती.

चलन रुबलदोन आठवड्यानंतर मध्यवर्ती बँकेने ही योजना बंद केली असली तरी या कालावधीत त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्लेषकांनी रशियन चलन रुबल सोन्याशी जोडले गेल्यास जागतिक चलनव्यवस्थेत मोठ्या बदलांची सुरुवात होईल, असा दावा केला होता. रशियाने सोने रुबलबरोबर जोडतानाच इंधन, धान्य व इतर काही धातूंचे मूल्यही रुबलशी जोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे रशियाकडून हे सर्व खरेदी करणाऱ्यांना रुबल किंवा सोने खरेदी करणे भाग पडेल आणि त्या दोन्हींचे मूल्य वधारेल, असेही सांगण्यात येते.

रशियाच्या सिक्युरिटी काऊन्सिलचे सचिव असणाऱ्या पत्रुशेव्ह यांनी अशा प्रकारची योजना कार्यान्वित करण्यासाठी रशियन तज्ज्ञ काम करीत असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ रशिया लवकरच अशा स्वरुपाची यंत्रणा लागू करु शकतो, असा दावा रशियन माध्यमे करीत आहेत. असे झाल्यास आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील अमेरिकी डॉलरच्या स्थानाला धक्का बसू शकतो. रशिया व चीन या दोन्ही देशांकडून गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी हालचाली सुरू होत्या. रशियाची योजना या हालचालींना निर्णायक वळण देणारी ठरेल, असे दिसत आहे.

leave a reply