नाटोत सहभागी व्हायचे की नाही, हे युक्रेनने ठरवावे

- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन

वॉशिंग्टन – अमेरिका व युरोपिय मित्रदेशांच्या ‘नाटो’ या लष्करी संघटनेत सहभागी व्हायचे की नाही, यावर युक्रेनला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. युक्रेनला नाटोत सहभागी न होता, तटस्थ रहायचे असेल, तर अमेरिका त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करील, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिली. युक्रेनच्या दौऱ्यावरुन परतलेले ब्लिंकन यांची सिनेटच्या समितीसमोर सुनावणी झाली. त्यावेळी बोलताना ब्लिंकन यांनी बायडेन प्रशासनाची भूमिका मांडली.

नाटोत सहभागीअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांना मंगळवारी सिनेटच्या ‘फॉरिन रिलेशन्स कमिटी’ला सामोरे जावे लागले. यावेळी या समितीचे सदस्य रँड पॉल यांनी बायडेन प्रशासनाच्या युक्रेनबाबतच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ‘युक्रेनचा नाटोतील सहभाग ही रशियासाठी रेड लाईन असेल, असे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बजावले होते. असे असतानाही बायडेन प्रशासनाने युक्रेनला नाटोत सहभागी करण्याच्या घोषणा करून रशियाच्या हल्ल्यांना आमंत्रण दिले’, अशी टीका पॉल यांनी केली. यावर बोलताना परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी बायडेन प्रशासनाच्या भूमिकेचे समर्थन केले. ‘युक्रेनने कुठल्या गटात जाऊन बसायचे, हा युक्रेनच्या परराष्ट्र धोरणाचा भागठरतो. ते रशिया युक्रेनवर थोपवू शकत नाही’, असे सांगून ब्लिंकन यांनी युक्रेनला नाटोतील सहभागाबाबत दिलेला प्रस्ताव योग्य होता, असे सांगितले. पण यापुढे युक्रेनला नाटोतील सहभाग टाळून तटस्थ भूमिका स्वीकारायची असेल, तर त्यासाठीही अमेरिका तयार असल्याचे ब्लिंकन म्हणाले.

तसेच यानंतरही अमेरिका युक्रेनला शस्त्रसज्ज करीत राहील, अशी घोषणा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली. मात्र बायडेन प्रशासनाचे हे धोरण युक्रेनमधील युद्धासाठी कारणीभूत ठरल्याचे ताशेरे रँड पॉल यांनी ओढले. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षातील सिनेटर्सचे देखील युक्रेनच्या मुद्यावरुन मतभेद असल्याचे याआधी उघड झाले होते. युक्रेनला नाटोत सहभागी करण्याची घोषणा करून बायडेन प्रशासनाने अमेरिकन अर्थव्यवस्थेसमोरील अडचणी वाढविल्याची टीका अमेरिकन सिनेटर्सनी केली होती.

दरम्यान, अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी युक्रेनबाबत स्वीकारलेल्या भूमिकेमुळे येत्या काळात युक्रेनचे तुकडे पडतील, असा इशारा रशियाच्या सुरक्षा काऊन्सिलचे प्रमुख निकोलाय पत्रूशेव्ह यांनी दिला.

leave a reply