रशियाने पोलंड व बल्गेरियाचा इंधनपुरवठा रोखला

- युरोपिय महासंघाकडून रशियावर गॅस ब्लॅकमेलिंगचा आरोप

इंधनपुरवठामॉस्को/ब्रुसेल्स – पाश्चिमात्यांच्या निर्बंधांना ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्याचा इशारा देणाऱ्या रशियाने आपले शब्द प्रत्यक्षात उतरविले. बुधवारी युरोपिय महासंघातील सदस्य देश असणाऱ्या पोलंड व बल्गेरियाचा इंधनपुरवठा रशियाने रोखला आहे. या दोन्ही देशांनी रशियन इंधनाची देणी रुबल या रशियन चलनात देण्याचे नाकारले होते. त्यानंतर रशियाने इंधनपुरवठा थांबविल्याचे समोर आले आहे. रशियाच्या या कारवाईवर महासंघाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. रशियाची ही ॲक्शन म्हणजे ‘ब्लॅकमेल’ असल्याचा आरोप कमिशनच्या प्रमुख उर्सुला व्हॉन देर लेयन यांनी केला.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर आक्रमक निर्बंध लादले होते. यामुळे रुबल कोसळला होता. रुबलचे मूल्य सावरण्यासाठी रशियाने काही आक्रमक निर्णय घेतले होते. त्यात इंधनाची आयात करणाऱ्या देशांनी रुबलमध्ये देणी चुकती करावीत, या निर्णयाचा समावेश होता. मात्र युरोपातील काही देशांनी त्याला विरोध करून रशियन इंधनाऐवजी पर्याय शोधण्याचे संकेत दिले होते. पोलंडने यासाठी पुढाकार घेतला होता. युरोपिय महासंघाने रशियन इंधनाच्या आयातीवर बंदी घालावी अशी मागणीही पोलंडकडून वारंवार करण्यात येत होती.

इंधनपुरवठाया पार्श्वभूमीवर, युरोपात इंधनपुरवठा करणाऱ्या ‘गाझप्रोम’ या रशियन कंपनीने बुधवारी पोलंड व बल्गेरिया या देशांचा इंधनपुरवठा बंद करीत असल्याची घोषणा केली. एप्रिल महिन्यातील इंधनाची देणी रुबलमध्ये मिळालेली नसल्याने पोलंड व बल्गेरियाला करण्यात येणारा इंधनपुरवठा थांबवित असल्याचे ‘गाझप्रोम’ने म्हटले आहे. हे दोन्ही देश रुबलमध्ये देणी देत नाही तोपर्यंत इंधनपुरवठा सुरू होणार नाही, असेही या कंपनीने बजावले आहे.

इंधनपुरवठा

रशियाच्या या कारवाईवर संबंधित देशांसह युरोपिय महासंघाकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली. पोलंडने रशियावर कराराचा भंग केल्याचा आरोप केला असून कायदेशीर लढाईचा इशारा दिला आहे. तर बल्गेरियाने गाझप्रोमचा निर्णय राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याची टीका करून याचा इतर युरोपिय देशांना फटका बसेल, असे बजावले आहे. युरोपियन कमिशनच्या प्रमुख उर्सुला व्हॉन देर लेयन यांनी, रशियाचा निर्णय म्हणजे ‘ब्लॅकमेल’ असल्याचा आरोप केला आहे. या निर्णयातून रशिया हा विश्वासार्ह भागीदार व इंधन पुरवठादार नसल्याचे सिद्ध होते, असा दावाही लेयन यांनी केला. यानंतर महासंघाच्या इंधन गटाची तातडीची बैठकही बोलावण्यात आली आहे.

दरम्यान, रशियाकडून इंधन घेणाऱ्या ऑस्ट्रियाने मात्र रुबलमध्ये देणी चुकती करण्याचे संकेत दिले आहेत. ऑस्ट्रियन इंधनकंपनी ‘ओएमव्ही’ने याची माहिती दिल्याचे रशियाचे स्पष्ट केले. यापूर्वी हंगेरीने देखील रुबलमध्ये रशियन इंधनाचे बील चुकते करण्याचे मान्य केले होते. युरोपच्या मागणीपैकी जवळपास 40 टक्के इंधन रशियाकडून आयात केले जाते. युक्रेन युद्धानंतर युरोपने रशियावर अनेक निर्बंध लादले असले तरी रशियाच्या इंधन आयातीवर निर्बंध लादण्यात महासंघ अपयशी ठरला आहे. रशियाव्यतिरिक्त इतर देशांकडून इंधन आयात वाढविण्याचे प्रयत्न युरोपिय देश करीत आहेत. मात्र कतार व इतर आखाती देशांनी रशियन इंधनाला पर्याय देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. यामुळे युरोपिय महासंघाची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसते आहे.

leave a reply