इराण-चीन लष्करी सहकार्य वाढविणार

तेहरान – चीनने पुढच्या 25 वर्षात इराणमध्ये 400 अब्ज डॉलर्सची धोरणात्मक गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. काही आठवड्यांपूर्वी या कराराची अंमलबजावणी सुरू झाली. दोन्ही देशांमधील सहकार्याच्या पुढच्या टप्प्यात इराण व चीन लष्करी सहकार्याची व्याप्ती वाढविणार असल्याची घोषणा इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी केली. चीनबरोबरचे हे लष्करी सहकार्य अमेरिकेच्या एकतर्फीवादाविरोधात असेल, असे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले.

चीनचे संरक्षणमंत्री वी फेंघ यांनी नुकताच इराणचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि संरक्षणमंत्री जनरल मोहम्मद रेझा अश्तीनाई यांची भेट घेतली. राष्ट्राध्यक्ष रईसी आणि चीनच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये झालेल्या भेटीत लष्करी सहकार्य वाढविण्यावर एकमत झाले. तसेच हे सहकार्य अमेरिकेच्या विरोधात असल्याचा संदेश दोन्ही देशांनी दिला.

लष्करी सहकार्य‘अमेरिकेच्या एकतंत्री कारभाराला विरोध करून जगात स्थैर्य प्रस्थापित करायचे असेल तर इराण आणि चीनसारख्या समविचारी सत्तांमध्ये सहकार्य आवश्यक आहे. सध्या आखाती क्षेत्रात आणि जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेता इराण-चीन यांच्यातील धोरणात्मक सहकार्याचे मोल स्पष्टपणे जाणवते’, असे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी स्पष्ट केले.

तर इराणचे संरक्षणमंत्री जनरल मोहम्मद रेझा यांनी आखातातील अमेरिकेच्या सैन्यतैनातीवर टीका केली. ‘ज्या क्षेत्रात अमेरिकेची सैन्यतैनाती आहे, त्या भागात असुरक्षितात, अस्थैर्य, फूट, निराशावाद, युद्ध, विनाश आणि विस्थापन यांची लाट आली आहे’, असे जळजळीत ताशेरे इराणच्या संरक्षणमंत्र्यांनी ओढले आहेत.

लष्करी सहकार्यचीनच्या संरक्षणमंत्र्यांनी थेट अमेरिकेचा उल्लेख न करता इराणबरोबर व्यापार लष्करी सहकार्य आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ‘दहशतवाद आणि एकतंत्री कारभाराच्या विरोधात लढण्यासाठी इराणबरोबरचे लष्करी सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरते. विशेषत: वर्तमानकाळातील घडामोडी आणि तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता या सहकार्याचे महत्त्व नाकारता येत नाही’, असे चीनचे संरक्षणमंत्री फेंघ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, चीनच्या संरक्षणमंत्र्यांच्या या इराण दौऱ्यावर आणि लष्करी सहकार्याबाबत केलेल्या घोषणेवर इस्रायलमधील लष्करी विश्लेषकांनी चिंता व्यक्त केली. चीन-इराणमधील हे सहकार्य आखातातील अमेरिकेच्या प्रभावाला आणि इस्रायलच्या सुरक्षेलाही आव्हान देणारे ठरेल, अशी चिंता या लष्करी विश्लेषकांनी व्यक्त केली.

व्हिएन्ना येथील अमेरिका व इराणमधील अणुकरारबाबतच्या वाटाघाटी अपयशी ठरत आहेत. तसेच चीनच्या ड्रोननिर्मिती कंपन्यांनी रशियातील आपले उत्पादन रोखले आहे. अशा परिस्थितीत, चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी इराणचा दौरा करून लष्करी सहकार्याबाबत केलेली घोषणा अत्यंत महत्त्वाची बाब ठरते, असे सांगून याकडे इस्रायली विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

leave a reply