रशियाने युक्रेनवर 40हून अधिक क्षेपणास्त्रे डागली

- आठवडाभरातील दुसरा मोठा क्षेपणास्त्र हल्ला

40हून अधिक क्षेपणास्त्रेमॉस्को/किव्ह – बाखमत शहरासह युक्रेनमधील इतर आघाडीवर आगेकूच करणाऱ्या रशियाने आपल्या हल्ल्यांची तीव्रता अधिक वाढविली आहे. गुरुवारी व शनिवारी रशियाने क्षेपणास्त्र हल्ले चढविले असून 40हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचे सांगण्यात येते. एका क्षेपणास्त्र हल्ल्यात मध्य युक्रेनमधील रिफायनरी उडवून दिल्याचा दावा करण्यात येतो. गेल्या आठवड्याभरात रशियाने मोठा क्षेपणास्त्र हल्ला करण्याची ही दुसरी वेळ ठरते. याच पार्श्वभूमीवर रशियाकडून मोठ्या आक्रमणाची तयारी सुरू असल्याच्या दाव्यांना दुजोरा देणारे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. त्यात युक्रेन सीमेपासून 170 मैलांवर असलेल्या रशियन भागात नवी लष्करी छावणी उभारण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे.

पुढील आठवड्यात रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्ष पूर्ण होत असताना युक्रेन मोहिमत मोठे यश मिळाल्याचे दाखविणे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासाठी महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पुतिन यांनी रशियन फौजांना हल्ले अधिक प्रखर, आक्रमक व व्यापक करण्याचे आदेश दिले होते. गेल्या काही दिवसांमध्ये रशियन फौजांकडून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. युक्रेन आघाडीवरील बहुतांश प्रांत व प्रमुख शहरांना रशियाकडून लक्ष्य करण्यात येत आहे. गुरुवारी तसेच शनिवारी झालेले क्षेपणास्त्र हल्ले त्याचाच भाग दिसतो.

गुरुवारी रशियाने युक्रेनमधील विविध शहरांवर जवळपास 36 क्षेपणास्त्रांचा मारा केला. यात पूर्व, दक्षिण व मध्य युक्रेनमधील शहरांचा समावेश होता. मध्य युक्रेनमधील क्रेमेन्चूक शहरातील इंधन शुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले. याव्यतिरिक्त युक्रेनचे तळ, वीजकेंद्रे व इतर सुविधांवर हल्ले झाल्याचे युक्रेनकडून सांगण्यात येते. हल्ल्यांसाठी ‘केएच-31’ व ‘ओनिक्स क्रूझ मिसाईल्स’ या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला.

शनिवारी ब्लॅक सीमधील युद्धनौकांवरून करण्यात आलेल्या हल्ल्यात कॅलिबर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. शनिवारच्या हल्ल्यात पश्चिम युक्रेनमधील ख्मेलनिट्स्की प्रांतामध्ये क्षेपणास्त्रे डागण्यात आली. एका लष्करी इमारतीसह काही नागरी इमारती व गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी तसेच शनिवारी झालेल्या हल्ल्यांमधील सुमारे 50 टक्के रशियन क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

दरम्यान, युद्धाला एक वर्ष पूर्ण होत असताना रशिया नवे आक्रमण सुरू करील, असे दावे युक्रेनसह पाश्चिमात्य देशांकडून करण्यात येत होते. या दाव्यांना पुष्टी देणारे सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. युक्रेन सीमेपासून सुमारे 170 मैलांवर असलेल्या व्होरोनेझ भागात नव्या लष्करी छावण्यांची उभारणी करण्यात आली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात लष्करी तुकड्या तसेच शस्त्रसामुग्रीही दाखल झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी युक्रेनवर हल्ला चढविताना याच भागात रशियाने जमवाजमव केली होती, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले आहे. नव्या आक्रमणासाठी रशिया जवळपास तीन लाख जवान तैनात करु शकतो, असे दावे करण्यात येत आहेत.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धात युक्रेन जिंकेल या गोष्टीवर ठेवलेला विश्वास म्हणजे आत्मघात ठरतो असा दावा अमेरिकेतील आघाडीचे पत्रकार सेमूर हर्श यांनी केला. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी युक्रेनचे केलेले समर्थन हा अत्यंत वाईट निर्णय असल्याची टीकाही हर्श यांनी केली. अमेरिका व इतर देशांनी रशियाबरोबर करार करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते, असा सल्लाही अमेरिकी पत्रकारांनी दिला.

leave a reply