पाश्चिमात्यांनी रशिया नष्ट करण्याची योजना आखली आहे

- संयुक्त राष्ट्रसंघटनेत रशियन राजदूतांचा आरोप

रशिया नष्ट करण्याचीन्यूयॉर्क/मॉस्को – ‘पाश्चिमात्यांनी रशिया नष्ट करण्याची, संपविण्याची योजना आखली आहे. त्यामुळे आमच्यासमोर देशाच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता’, असा आरोप रशियाचे संयुक्त राष्ट्रसंघटनेतील राजदूत वॅसिली नेबन्झिआ यांनी केला. यावेळी त्यांनी पोलंड व इतर बाल्टिक देशांचा रशियाचे तुकडे झालेले पाहण्याची इच्छा असून रशियातील नैसर्गिक संपत्तीवर ताबा मिळवायचा आहे, असा ठपकाही ठेवला.

रशिया-युक्रेनमधील मिन्स्क करारासंदर्भात चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात रशियन राजदूतांनी पाश्चिमात्य देशांच्या इराद्यांना लक्ष्य करीत युक्रेनवरील हल्ल्याचे समर्थन केले. ‘मिन्स्क शांतीचर्चेचा वापर धूळफेक करण्यासाठी करण्यात आला. या काळात युक्रेनला शस्त्रसज्ज करण्यात आले. पाश्चिमात्य देशांनी त्यांचे भूराजकीय हितसंबंध जपण्यासाठी युक्रेनला रशियाविरोधी युद्धासाठी तयार केले’, असा ठपका रशियन राजदूतांनी ठेवला. रशियन राजदूतांचे हे आरोप पाश्चिमात्य देशांच्या प्रतिनिधींनी फेटाळले आहेत.

रशिया नष्ट करण्याचीदरम्यान, युरोपात सुरू झालेल्या म्युनिक सुरक्षा परिषदेतही युक्रेनच्या मुद्याला प्राधान्य देण्यात आले आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यांच्यासह नाटोनेही या परिषदेत युक्रेनच्या शस्त्रपुरवठ्याचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. ब्रिटनचे पंतप्रधान ॠषी सुनाक यांनी, पाश्चिमात्य देशांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे आडाखे चुकवून युक्रेनला सहाय्य करण्यासाठी वेगाने व एकत्रितपणे पावले उचलायला हवीत, असे आवाहन केले. युक्रेनला नाटो देशांच्या दर्जाची व क्षमतेची शस्त्रे पुरवायला हवीत, असे पंतप्रधान सुनाक यांनी सांगितले.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी, जोपर्यंत युद्ध सुरू राहिल तोपर्यंत शस्त्रपुरवठा कायम ठेवला जाईल असे आश्वासन दिले आहे. नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनीही युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा सुरू करणे आवश्यक असल्याची भूमिका मांडली.

leave a reply