पाश्चिमात्यांच्या निर्बधांनंतरही रशियाच्या इंधन निर्यातीत वाढ

- ‘ब्लूमबर्ग’चा दावा

इंधन निर्यातीत वाढवॉशिंग्टन/मॉस्को – रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर रशियन अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या इंधनक्षेत्राला खिळखिळे करण्याच्या वल्गना अमेरिका व युरोपिय देशांच्या आघाडीने केल्या होत्या. मात्र रशियन इंधन कंपन्या तसेच बँकांवर लादलेले निर्बंध व रशियन इंधन खरेदी करणाऱ्या देशांवर टाकलेल्या दडपणानंतरही रशियन इंधनाची मागणी कमी झालेली नाही. रशियाने गेल्या आठवड्यात प्रतिदिनी ३६ लाख बॅरल्स अशा सरासरीने कच्च्या तेलाची निर्यात केल्याची माहिती ‘ब्लूमबर्ग’ या अमेरिकी वेबसाईटने दिली आहे.

रशियाविरोधी आघाडीचा भाग असणाऱ्या जी-७ गटासह काही मित्रदेशांनी रशियन इंधनाच्या दरांवर मर्यादा आणण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी डिसेंबर महिन्यात सुरू होईल, असे सांगण्यात येते. याअंतर्गत रशियन इंधन कंपन्यांना विमा व इतर सेवा पुरविणाऱ्या परदेशी कंपन्यांना दंडही आकारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात रशियन तेलाची खरेदी वाढविली आहे.

४ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात रशियातील दोन कोटी ५० लाख बॅरल्स कच्चे तेल असलेले ३४ टँकर्स परदेशी पुरवठ्यासाठी रवाना झाल्याचे समोर आले. त्यापूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत रशियन तेलाचे प्रमाण ३२ लाख बॅरल्सनी वाढल्याचे ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तात सांगण्यात आले. सर्वाधिक टँकर्स रशियाच्या आर्क्टिक क्षेत्रातील टर्मिनलमधून झाल्याची माहिती वृत्तात देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाकडून होणारी इंधनवायूची निर्यात विक्रमी स्तराकडे वाटचाल करीत असल्याचे उघड झाले होते. एकापाठोपाठ आलेल्या या माहितीतून रशियाचे इंधनक्षेत्रातील वर्चस्व मोडण्यात पाश्चिमात्य आघाडी अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे.

leave a reply