भारतीय लष्कराची सुसज्जता सर्वोच्च पातळीवर असावी

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

नवी दिल्ली – भारतीय लष्कराने सुसज्जतेच्या सर्वोच्च पातळीवर असले पाहिजे, अशी अपेक्षा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली. लष्कराच्या ‘कमांडर्स कॉन्फरन्स’ला संबोधित करताना संरक्षणमंत्री बोलत होते. एक अब्जाहून अधिक जनतेचा पूर्ण विश्वास असलेले भारतीय लष्कर सर्वाधिक विश्वासार्ह व प्रेरणेचा स्त्रोत आहे, असे सांगून संरक्षणमंत्र्यांनी यावेळी लष्कराची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

Rajnath Singhचीन आणि पाकिस्तानलगतच्या सीमेवरील सुरक्षेचा आढावा या कमांडर्स कॉन्फरन्समध्ये घेण्यात येत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या तिसऱ्या दिवशी संरक्षणमंत्र्यांनी संबोधित केले. लष्कराने सदैव सुसज्जतेच्या सर्वोच्च पातळीवर असावे, अशी अपेक्षा व्यक्त करून राजनाथ सिंग यांनी कुठलीही मोहीम फत्ते करण्याची तयारी लष्कराने ठेवावी, असा संदेश दिली. सध्या चीन व पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या या संदेशाचे महत्त्व वाढले आहे.

चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कारकिर्दीचे तिसरे सत्र सुरू झाले आहे. त्याचवेळी या देशासमोर फार मोठ्या आर्थिक समस्या खड्या ठाकल्या आहेत. यामध्ये दुष्काळापासून ते कोरोनाच्या साथीनंतर आलेल्या आर्थिक मंदीसारख्या संकटांचा समावेश आहे. याचे राजकीय व सामाजिक परिणाम चीनमध्ये दिसू लागले असून या देशात निदर्शने केली जात आहे. जनतेने अशारितीने रस्त्यावर उतरून राजवटीला विरोध करण्याची परंपरा चीनमध्ये नाही. आपल्याच देशाच्या नागरिकांवर रणगाडे चालवून चीन निदर्शने मोडून काढतो हे १९८९ सालच्या तिआनमेन स्क्वेअरमधील निदर्शनातून उघड झाले होते.

चीनची राजवट अंतर्गत स्थितीमुळे धोक्यात आलेली असताना, चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या परिषदेत गलवानच्या खोऱ्यात झालेल्या भारत व चीनच्या जवानांमधील संघर्षाचे व्हिडिओज्‌‍ दाखविण्यात आले होते. त्यामुळे चीनची राजवट भारताविरोधात वातावरण तयार करीत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. त्याचवेळी पाकिस्तानमध्येही राजकीय अस्थैर्य माजले असून भारतद्वेष ही एकमेव बाब पाकिस्तानची एकजूट वाढविणारी असल्याने पाकिस्तानपासून भारताला असलेला धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिलेल्या संदेशाचे महत्त्व वाढले आहे.

leave a reply