रशियातील सोन्याचे राखीव साठे २,३०० टनांवर

- परकीय गंगाजळीतही मोठी वाढ

मॉस्को – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर १८०० डॉलर्स प्रति औंसाचा विक्रमी टप्पा पार करीत असतानाच रशियानेही आपल्याकडील सोन्याच्या साठ्यांसह परकीय गंगाजळीत मोठी भर टाकल्याचे समोर आले आहे. रशियाकडील सोन्याचे साठे २,३०० टनांवर गेले असून त्याचे मूल्य १३० अब्ज डॉलर्स झाले आहे. रशियातील परकीय गंगाजळीही सुमारे ५७० अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

रशियातील सोन्याचे राखीव साठे २,३०० टनांवर२०१४ साली रशियाने क्रिमीआवर मिळवलेला ताब्यानंतर अमेरिका तसेच युरोपीय महासंघाने रशियन अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले होते. या निर्बंधांचा मुकाबला करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी, अमेरिकी डॉलरचा वापर घटवून सोन्याचे साठे व परकीय गंगाजळी वाढविण्याचे आदेश दिले होते. २०२० सालापर्यंत परकीय गंगाजळी ५०० अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले होते. हे उद्दिष्ट पार करून रशियाची परकीय गंगाजळी तब्बल ५६८ अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

रशियातील सोन्याचे राaखीव साठे २,३०० टनांवरपरकीय गंगाजळीत भर टाकताना रशियाने त्यातील सोन्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. रशियाच्या मध्यवर्ती बँकेकडून गेली पाच वर्षे सातत्याने सोन्याची खरेदी सुरू आहे. अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दीर्घकालीन धोरणाचा भाग म्हणून ही खरेदी करण्यात येत असल्याचे मध्यवर्ती बँकेकडून स्पष्ट करण्यात आले. जून महिन्यात सोन्याच्या राखीव साठ्याचे प्रमाण २,३०० टनांवर गेल्याची माहिती रशियन सूत्रांकडून देण्यात आली. या साठ्याचे मूल्य १३० अब्ज डॉलर्सहून अधिक असून परकीय गंगाजळीतील त्याचा हिस्सा २१ टक्क्यांवर गेला आहे.

रशियातील सोन्याच्या उत्पादनातही वाढ होत असून या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील सोन्याचे उत्पादन ६४ टनांवर गेल्याची माहिती ‘द युनियन ऑफ गोल्ड प्रोड्युसर्स ऑफ रशिया’ने दिली. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत सोन्याच्या उत्पादनात पाच टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाल्याचेही रशियन संस्थेने म्हटले आहे. कोरोनाची साथ व आर्थिक मंदीची पार्श्वभूमी असताना रशियाने सोन्याच्या साठयांसह परकीय गंगाजळीत टाकलेली भर लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

leave a reply