लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचा जम्मू-पठाणकोट दौरा

जम्मू – लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी सोमवारी जम्मूच्या सीमा क्षेत्राचा दौरा केला. तसेच त्यानंतर त्यांनी पठाणकोटलाही भेट दिली. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानाने गिलगिट बाल्टिस्तानमध्ये तैनाती वाढविल्याच्या बातम्या आल्या होत्या. यापार्श्वभूमीवर जनरल नरवणे यांनी लष्कराच्या तयारीचा आणि सीमाभागातील सुरक्षेचा आढावा घेतला. गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी केलेल्या जम्मू-कश्मीरच्या या दौऱ्याचे महत्व वाढले आहे.

Narwane-Pathankot-Jammuसोमवारी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेबरोबर आंतरराष्ट्रीय सीमेचा दौरा केला. याआधी वरिष्ठ लष्करी अधिकऱ्यांबरोबर जनरल नरवणे यांनी चर्चा केली. तसेच त्यानंतर जनरल नरवणे यांनी जवानांशी संवाद साधला. कठुआ, सांबा, जम्मू, पठाणकोटमधील संरक्षण सज्जतेचा आणि जवानांच्या तयारीचा जनरल नरवणे यांनी आढावा घेतल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले.

शत्रू देशाकडून कोणत्याही प्रकारची आगळीक खपवून घेतली जाणार नाही. त्याला सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असे यावेळी जनरल नरवणे यांनी बजावले. पाकिस्तानच्या ‘बॉर्डर अ‍ॅक्शन टीम’ अर्थात ‘बॅट’कडून सुरक्षादल आणि स्थानिकांवर हल्ले घडविले जाऊ शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी नुकताच दिला होता. यापार्श्वभूमीवर नरवणे यांची ही विधाने लक्षवेधी ठरतात. जनरल नरवणे यांच्या या दौऱ्याचे अधिक तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरच्या सीमेवर सतत गोळीबार सुरु आहे. तसेच दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत. लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये कधीही संघर्ष पेटेल अशी परिस्थिती निर्माण झाली असताना पाकिस्तानकडून गिलगिट बाल्टिस्तानमध्ये २० हजार अतिरिक्त जवानांची तैनाती करण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच या काळात पाकिस्तानकडून गोळीबारातही वाढ झाली होती. मात्र भारत एकाचवेळी पाकिस्तान आणि चीन या दोन्ही आघाड्यांवर लढण्यास सज्ज आहे, हे भारताकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले होते. यावेळीही भारतीय लष्करप्रमुखांचा काश्मीर दौरा पाकिस्तानला सज्जड इशारा देणारा असल्याचे दिसत आहे.

leave a reply