सिरियातील अमेरिकी जवानांवर रशियाने एनर्जी वेपनचा हल्ला चढविला

- पेंटॅगॉनकडून चौकशीचे आदेश

वॉशिंग्टन – युक्रेन, सायबर हल्ले याप्रकरणी अमेरिका आणि रशियात निर्माण झालेल्या वादात नव्या प्रकरणाची भर पडली. सिरियामध्ये तैनात अमेरिकी जवानांवर एनर्जी वेपनचा हल्ला झाल्याचा दावा पेंटॅगॉनने करीत आहे. या हल्ल्यांसाठी रशिया जबाबदार असल्याचा संशय पेंटॅगॉनने व्यक्त केला असून याची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तर रशियन माध्यमांनी पेंटॅगॉनच्या या आरोपांची खिल्ली उडविली.

अमेरिकेतील आघाडीच्या वृत्तसंस्थेने काही दिवसांपूर्वी चार माजी सुरक्षा अधिकार्‍यांच्या हवाल्याने खळबळजनक बातमी प्रसिद्ध केली होती. वर्षभरापूर्वी सिरियाच्या उत्तरेकडील सीमेवर तैनात अमेरिकी जवानांवर रशियाने डायरेक्ट एनर्जी वेपनचा वापर झाल्याचे यामध्ये म्हटले होते. या हल्ल्यामध्ये अमेरिकेचे जवान जखमी झाले होते. या आरोपांच्या चौकशीसाठी अमेरिकन सिनेटच्या दोन समितींची स्थापना झाल्याची माहिती सदर वृृत्तसंस्थेने दिली.

जखमी झालेल्या जवानांमध्ये फ्लू सारखी लक्षणे आढळून आली होती, असे या घटनेशी संबंधित पेंटॅगॉनच्या दोन अधिकार्‍यांनी अमेरिकी वृत्तसंस्थेला सांगितले. सिनेटमध्ये अमेरिकेच्या सेंट्रल कमांड अर्थात सेंटकॉमचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकॅन्झी यांना याबाबत प्रश्‍न करण्यात आले. तेव्हा या घटनेचे पुरावे नसून संबंधित हल्ल्याची चौकशी सुरू असल्याचे जनरल मॅकॅन्झी म्हणाले.

सिरियामध्ये अमेरिकी जवानांवर असा हल्ला कसा झाला, या प्रकरणी पेंटॅगॉन तसेच अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. तर खरोखरच हा एनर्जी वेपनचाच हल्ला होता का, असा खोचक प्रश्‍न रशियन माध्यमे विचारत आहेत. फ्लू सारखी लक्षणे असतील, तर मग अमेरिकी जवानांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा व त्यांनी याचे रशियावर खापर फोडले असावे, अशी शक्यताही रशियन माध्यमे वर्तवित आहेत.

याआधी क्यूबा या कॅरेबियन देशाची राजधानी हवाना येथील अमेरिकेच्या दूतावासातील अधिकार्‍यांवरही एनर्जी वेपनचा हल्ला झाल्याचा आरोप अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.

क्यूबा येथील अमेरिकी राजनैतिक अधिकार्‍यांच्या श्रवणेंद्रियांवर प्रचंड ताण पडत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याचबरोबर राजनैतिक अधिकार्‍यांना थकवा जाणवणे आणि डोकेदुखी असे आजार जडले होते. काही अधिकार्‍यांच्या मेंदूवर कायमस्वरुपी परिणाम झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

त्यानंतर ट्रम्प यांच्या प्रशासन काळात चीनबरोबर तणाव निर्माण झालेला असताना, बीजिंग येथील अमेरिकी दूतावासाच्या काही राजनैतिक अधिकार्‍यांवरही ‘हवाना सिंड्रोम’सारखा हल्ला झाला होता. अमेरिकेबरोबरील व्यापारयुद्ध तेजीत असताना सदर प्रकरण समोर आले होते. तेव्हा चीनने अमेरिकी राजनैतिक अधिकार्‍यांवर मायक्रोवेव्ह वेपनचा हल्ला चढविल्याचा आरोप झाला होता.

leave a reply