युरोपने रशियन इंधन नाकारल्यास आशियामध्ये निर्यात वाढवणार

- रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक

अलेक्झांडर नोवाकमॉस्को/ब्रुसेल्स – युरोपिय महासंघाने इंधन व ऊर्जेची गरज भागविण्यासाठी 300 अब्ज युरोची तरतूद असणाऱ्या नव्या योजनेची घोषणा केली. या योजनअंतर्गत रशियातून होणारी आयात 2030 सालापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येईल, असा दावा महासंघाने केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना, युरोपने नाकारलेले रशियन इंधन आशिया खंडाकडे वळविल, असा इशारा रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी दिला. त्याचवेळी रशियाने इंधनाच्या पेमेंटसाठी रुबलची घातलेली अट युरोपातील 20हून अधिक कंपन्यांनी पूर्ण केल्याची माहितीही नोवाक यांनी दिली.

बुधवारी युरोपिय महासंघाने ‘रिपॉवर ईयू’ नावाची योजना जाहीर केली. या योजनेत 300 अब्ज युरोची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी रशियन इंधनाव्यतिरिक्त इतर पर्यायांचा वापर करून इंधनाची आयात तसेच ऊर्जानिर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. नव्या योजनेनुसार, 2030 सालापर्यंत युरोपात हरित तसेच अक्षय ऊर्जेचा वापर 45 टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. हंगेरी व स्लोव्हाकियासारखे देश रशियन पाईपलाईनवर अवलंबून राहू नये म्हणून दोन अब्ज युरोची तरतूद करण्यात आली आहे. नैसर्गिक इंधनवायूशी निगडित पायाभूत सुविधांसाठी 10 अब्ज युरोची तरतूद करण्यात आली आहे.

युरोपिय महासंघाच्या या योजनेवर रशियाकडून प्रतिक्रिया उमटली. ‘युरोप रशियाकडून दररोज सुमारे 40 लाख बॅरल्स तेल आयात करतो. हे तेल युरोपिय देशांनी नाकारल्यास ते आशियात पाठविण्यात येईल. युरोपवर इतर स्रोतांकडून अधिक महागडे तेल खरेदी करण्याची वेळ येईल’, असे उपपंतप्रधान नोवाक यांनी बजावले. एकीकडे युरोप रशियन इंधन नाकारण्याच्या गोष्टी करीत असतानाच अनेक युरोपिय कंपन्यांनी रशियन इंधनाच्या पेमेंटसाठी रुबलची खाती उघडल्याकडे नोवाक यांनी लक्ष वेधले. रशियाशी इंधनाचे व्यवहार करणाऱ्या 54 युरोपिय कंपन्यांपैकी 50 टक्क्यांहून अधिक कंपन्यांनी रुबल खाते उघडले आहे, असे रशियन उपपंतप्रधानांनी सांगितले.

अलेक्झांडर नोवाकरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मार्च महिन्यात रशियन इंधनाचे पेमेंट रुबलमधून घेण्याचे आदेश दिले होते. पुतिन यांच्या या आदेशाला युरोपिय देशांनी कडाडून विरोध केला होता. मात्र या मुद्यावरून रशियाने पोलंड व बल्गेरियाला होणारा इंधनपुरवठा थांबविल्यावर युरोपिय कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर अनेक युरोपियन कंपन्यांनी रशियन चलन रुबलचा वापर असणारी स्वतंत्र खाती उघडली. यात जर्मनी, इटली व ऑस्ट्रिया यासारख्या आघाडीच्या देशांमधील कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे शाब्दिक इशारे देणाऱ्या युरोपिय देशांनी प्रत्यक्षात रशियाच्या दबावापुढे मान झुकविल्याचे स्पष्ट होत आहे.

युरोपला इशारा देतानाच नोवाक यांनी रशियाचे तेल उत्पादन पुन्हा पूर्ववत होत असल्याकडेही लक्ष वेधले. एप्रिल महिन्यात रशियाचे उत्पादन प्रतिदिनी 10 लाख बॅरल्सनी घटले होते. मात्र मे महिन्यात त्यात प्रतिदिन दोन ते तीन लाख बॅरल्सची वाढ झाल्याची जाणीव रशियन नेत्यांनी यावेळी करून दिली. युरोपमधील इंधनाची मागणी घसरत असली तरी भारत, चीन व इतर काही देशांकडून मागणी वाढत असल्याचे संकेत नोवाक यांनी यावेळी दिले.

leave a reply