चीनच्या बॉम्बर्स विमानांचा अमेरिका व मित्रदेशांना इशारा

बीजिंग – चीनच्या सुमारे 14 लढाऊ व बॉम्बर विमानांनी शुक्रवारी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली. तर त्याच्या काही तास आधी चीनच्या बॉम्बर विमानांनी फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रातून प्रवास केला. ही बॉम्बर विमाने युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रांनी सज्ज होती, अशी माहिती चीनने दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन दक्षिण कोरियामध्ये असताना, चीनच्या बॉम्बर विमानांची ही कारवाई अमेरिकेसह या क्षेत्रातील अमेरिकेच्या मित्रदेशांना इशारा देणारी ठरते.

चार जे-11 लढाऊ विमाने, तर पाच जे-16 लढाऊ विमाने आणि एच-6 बॉम्बर विमानाने शुक्रवारी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली. चीनच्या या विमानांनी बराच काळ तैवानच्या हद्दीत घिरट्या घातल्या. त्यानंतर तैवानने आपली लढाऊ विमाने रवाना करून चीनच्या विमानांना माघार घेण्यास भाग पाडले. तैवानच्या हद्दीत चीनच्या लढाऊ विमानांची घुसखोरी ही वाटते तितकी साधारण बाब नाही, असा इशारा अमेरिकन विश्लेषकांनी दिला आहे.

24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केल्याबरोबर चीनने देखील तैवानच्या हद्दीत विमानांची घुसखोरी केली होती. पुढच्या काळात चीनने घुसखोरीच्या तीव्रतेत वाढ केली आहे. यासह चीन आपली हवाईक्षेत्र विस्तारीत करून तैवानच्या हवाईहद्दीवर आपला अधिकार सांगण्याची तयारी करीतआहे. याप्रकारे गेल्या वर्षभरापासून चीन तैवानच्या हवाईहद्दीत अतिक्रमण करीत असल्याचा आरोप अमेरिकन विश्लेषक करीत आहेत.

तसेच गेल्या काही आठवड्यांपासून चीनच्या विमानांच्या ताफ्यातील बॉम्बर विमानांचा वाढता वापर अतिशय चिंताजनक असल्याचे पाश्चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे. शुक्रवारी तैवानच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी विमानांच्या ताफ्यात देखील बॉम्बर विमान होते. तर दोन दिवसांपूर्वी साऊथ चायना सी क्षेत्रातून गस्त घालणाऱ्या चीनच्या लिओनिंग या विमानवाहू युद्धनौकेला साथ देण्यासाठी बॉम्बर विमाने तैनात करण्यात आली होती.

या बॉम्बर विमानांवर प्रत्येकी दोन चिनी बनावटीची वायजे-12 सुपरसोनिक युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रे बसविलेली होती. परदेशी जवानांना तैवानपासून दूर ठेवण्यासाठी चीन युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रांनी सज्ज बॉम्बर विमानांची गस्त घालत असल्याचा दावा चिनी विश्लेषकच करीत आहेत. तैवानच्या सुरक्षेसाठी आपण वचनबद्ध असल्याचे सांगणाऱ्या अमेरिका, जपान आणि इतर देशांना इशारा देण्यासाठी चीनने बॉम्बर विमाने रवाना केल्याची शक्यता वर्तविण्यात येते.

रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्याप्रमाणे येत्या काळात चीनदेखील तैवानवर कारवाई करील, असा इशारा आंतरराष्ट्रीय नेते, विश्लेषक देत आहेत. तैवानची तुलना युक्रेनशी करता येणार नसल्याचे सांगून चीनने हे आरोप फेटाळले होते. पण चीनने तैवान व अमेरिकेच्या गुआम बेटावर हल्ल्याची तयारी केल्याचे काही दिवसांपूर्वीच सॅटेलाईट फोटोग्राफ्समधून उघड झाले होते. चीनने तैवानच्या ईशान्येकडील भागाची तसेच गुआममधील काही भागांची प्रतिकृती तयार करून त्यावर हल्ल्याचा सराव केला होता. त्यामुळे चीनने तैवानवर तसेच गरज पडल्यास अमेरिकेच्या तळावरही हल्ल्याची तयारी केल्याचे दिसत आहे.

leave a reply