रशिया तालिबान व नॅशनल रेझिस्टन्समध्ये मध्यस्थीसाठी तयार

- रशियाचे विशेषदूत झमिर काबुलोव्ह

काबुल – ‘अफगाणिस्तानातील गृहयुद्ध टाळण्यासाठी तालिबान आणि नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटमध्ये मध्यस्थी करायला रशिया तयार आहे. पण यासाठी अफगाणिस्तानातील या दोन्ही गटांची सहमती हवी’, अशी घोषणा अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेले रशियाचे विशेषदूत झमिर काबुलोव्ह यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून रशियाने अफगाणिस्तानबाबत काही महत्त्वाची पावले उचलल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर, रशियाची ही घोषणा लक्षवेधी ठरते.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेले विशेषदूत झमिर काबुलोव्ह यांनी मंगळवारी रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना अफगाणिस्तानातील गटांसाठी संदेश दिला. तालिबान आणि नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटच्या नेत्यांना रशियामध्ये बैठक करायची असेल तर त्यासाठी रशिया तयार असल्याचे काबुलोव्ह म्हणाले. येत्या काळात तालिबान आणि नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटमधील मतभेदांमुळे अफगाणिस्तानात गृहयुद्ध भडकू नये, अशी रशियाची अपेक्षा असल्याचे काबुलोव्ह यांनी सांगितले.

रशिया तालिबान व नॅशनल रेझिस्टन्समध्ये मध्यस्थीसाठी तयार - रशियाचे विशेषदूत झमिर काबुलोव्हत्याचबरोबर काही दिवसांपूर्वी नॉर्वेची राजधानी ऑस्लोमध्ये तालिबानच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीवर काबुलोव्ह यांनी टीका केली. अमेरिका व समर्थक देशांनी आयोजित केलेल्या या बैठकीतून विशेष काही निष्पन्न होणार नसल्याचे काबुलोव्ह म्हणाले.

अमरुल्ला सालेह आणि अहमद मसूद यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ‘नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट-एनआरएफ’ने रशियाच्या या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण एनआरएफच्या सूत्रांनी अफगाणी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यापूर्वी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये तालिबान आणि एनआरएफच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली.

यामध्ये तालिबानच्या राजवटीचा उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादार, संरक्षण विभागाचा प्रमुख आणि तालिबानचा संस्थापक मुल्ला ओमरचा मुलगा मुल्ला याकूब मुजाहिद सहभागी झाले होते. बरादर आणि याकूब यांनी छुप्यारितीने रशियाला भेट दिली होती, असा दावा अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख रहमतुल्ला नबिल यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. अफगाणी माध्यमांमध्ये याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष आणि एनआरएफचे नेते अमरुल्ला सालेह याच काळात रशियन राजधानीमध्ये उपस्थित होते. तर अहमद मसूद आणि सलाहुद्दीन रब्बानी देखील सालेह यांना या बैठकीसाठी सामील होणार असल्याचा दावा अफगाणी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने केला होता. एनआरएफने यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. तर तालिबानने देखील सदर वृत्त फेटाळलेले नाही. त्यामुळे रशियाच्या मध्यस्थीने एनआरएफ आणि तालिबानच्या नेत्यांमध्ये भेट झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते.

महिन्याभरापूर्वी इराणची राजधानी तेहरान येथेही तालिबानचा कमांडर मोत्ताकी आणि एनआरएफचे नेते अहमद मसूद यांच्यात छुपी भेट झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अफगाणिस्तानच्या दोन्ही गटांनी हे वृत्त फेटाळले होते. पण काही तासानंतर तालिबान व एनआरएफने या भेटीची कबुली दिली होती.

leave a reply