चीनच्या भारतविरोधी कारवाया थांबलेल्या नाहीत

नवी दिल्ली/बीजिंग – गेल्या महिन्यात भारत आणि चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये लडाखच्या एलएसीबाबत झालेली चर्चेची १४वी फेरी निष्फळ ठरली होती. त्यानंतर सलोखा कायम ठेऊन सदर प्रश्‍न वाटाघाटींद्वारे सोडविण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले होते. पण चीनच्या भारतविरोधी कारवाया थांबलेल्या नाहीत. अरुणाचल प्रदेशमधील तरुणाचे अपहरण व गलवान खोर्‍यात भारतीय सैनिकांकडून मार खाणार्‍या चिनी लष्कराच्या अधिकार्‍याला हिवाळी ऑलिंपिकमध्ये बहुमान देऊन चीनने आपला भारतद्वेष जगजाहीर केला आहे.

चीनच्या भारतविरोधी कारवाया थांबलेल्या नाहीतगेल्या काही महिन्यांपासून लडाख ते अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर चीन आपण बरेच काही घडवित असल्याचा आभास निर्माण करीत आहे. अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर चीनच्या लष्कराने गाव वसविल्याचा प्रचार सुरू केला आहे. त्यानंतर लडाखच्या एलएसीजवळ तैनात असलेले चीनचे जवान नृत्य करीत असल्याचे दाखविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला होता. या घटनांनंतर आता चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारताच्या अरुणाचल प्रदेशमधून एका १७ वर्षीय तरुणाचे अपहरण केल्याची घटना समोर आली होती.

टॅरन असे नाव असलेल्या तरुणाचे चीनच्या लष्कराने गेल्या महिन्यात अपहरण केले होते. २७ जानेवारी रोजी त्याची सुटका करण्यात आली असून त्याच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आले. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्याने चिनी लष्कराने आपला प्रचंड छळ केल्याचे तसेच वारंवार इलेक्ट्रिक शॉक दिल्याची माहिती टॅरनने दिली. यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय युवकाचा अशारितीने छळ करून चीनचे लष्कर आपला पराक्रम सिद्ध करू पाहत आहे. गलवानच्या संघर्षात भारतीय सैन्याकडून सपाटून मार खाणार्‍या चीनच्या लष्कराने भारताच्या युवकावर त्याचा राग काढला का, असा प्रश्‍न सोशल मीडियावर विचारला जात आहे.

चीनच्या भारतविरोधी कारवाया थांबलेल्या नाहीतयाआधीही चीनचे लष्कर एलएसीवर आपण वर्चस्व गाजवत असल्याचे दाखविण्यासाठी धडपडत असल्याचे समोर आले होते. विशेषतः या संघर्षात आपण भारतावर मात केल्याचे चिनी लष्कराला आप्लया जनतेला दाखवायचे आहे. त्यासाठी निरनिराळे पर्याय वापरले जात आहे. हा चीनच्या भारतविरोधी प्रचारयुद्धाचाही भाग ठरतो, असा दावा भारताचे माजी लष्करी अधिकारी करीत आहेत.

याबरोबरच गलवानच्या खोर्‍यात भारतीय सैनिकांकडून सपाटून मार खाऊन बरेच महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या चिनी लष्कराच्या अधिकार्‍याला बीजिंगमधल्या विंटर ऑलिंपिकमध्ये विशेष सन्मान दिला जात आहे. गलवानच्या खोर्‍यात झालेल्या संघर्षातील शहिदांना भारताने फार मोठा सन्मान दिला. पण चीन मात्र आपले नक्की किती जवान ठार झाले व कितीजण जखमी झाले, याची साधी माहितीही उघड करायला तयार नाही. आत्तापर्यंत चीनच्या लष्कराने याबाबत अधिकृत पातळीवर जी काही माहिती दिली, त्यावर चीनचे नेटकरही विश्‍वास ठेवायला तयार नाही. पण आपल्या जवानांना चीन सन्मान देत नाही, हा ठपका चिनी लष्कराला अडचणीत आणणारा ठरला आहे. या आक्षेपाला उत्तर देण्यासाठी चीन धडपडत असल्याचे दिसते.

leave a reply