रशियाने युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांबाबत अमेरिकेविरोधात नवे पुरावे प्रसिद्ध केले

नवे पुरावे प्रसिद्धमॉस्को – युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांमध्ये अमेरिका जैविक शस्त्रास्त्रांवर काम करीत होती, असा आरोप करून रशियाने यासंबंधी नवे पुरावे प्रसिद्ध केले. गेल्या चार वर्षांमध्ये युक्रेनच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या संसर्गात या प्रयोगशाळांमधील जैविक शस्त्रास्त्रांचा वापर केल्याचा ठपका रशियाने ठेवला. आपल्यावरील हे आरोप खोडून काढण्यासाठी अमेरिकेने युक्रेनमधील या प्रयोगशाळांबाबतची सारी माहिती उघड करावी, अशी मागणी रशियाने केली.

युक्रेनमधील ३० हून अधिक जैविक प्रयोगशाळांना निधी पुरविणार्‍या अमेरिकेवरील रशियाने दबाव वाढविला आहे. गेल्या चोवीस तासात रशियाचे संरक्षण तसेच परराष्ट्र मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्रसंघातील रशियन राजदूतांनी या जैविक प्रयोगशाळांचा मुद्दा उपस्थित करून पुरावे उघड केले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या ‘न्युक्लिअर, बायोलॉजिकल अँड केमिकल प्रोटेक्शन फोर्सेस ऑफ रशिया’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह यांनी माध्यमांसमोर हे नवे पुरावे मांडले.

६ मार्च २०१५ सालच्या कागदपत्रांचा हवाला देऊन युक्रेनमधील जैविक प्रयोगशाळांना अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉन निधी पुरवित असल्याचा कागदोपत्री उल्लेख मिळाल्याचे किरिलोव्ह यांनी सांगितले. पेंटॅगॉनने जाहीरपणे युक्रेनच्या आरोग्य मंत्रालयाला हा निधी पुरविला होता. पण तीन कोटी, २० लाख डॉलर्सचा निधी राजधानी किव्हसह, ओडेसा, लोव्ह आणि खारकोव्ह येथील युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रयोगशाळांना देण्यात आला होता, हे किरिलोव्ह यांनी लक्षात आणून दिले.

नवे पुरावे प्रसिद्धया प्रयोगशाळांमध्ये ‘क्रिमिआ-कॉंगो रक्तस्त्रावी ताप, लेप्टोस्पायरोसीस आणि हंता व्हायरस यांच्यावर काम सुरू होते. पेंटॅगॉन या विषाणूंच्या संशोधनाशी जोडलेली होती, असा आरोप किरिलोव्ह यांनी केला. याशिवाय युक्रेनच्या पाच हजार नागरिकांच्या रक्ताचे नमूने जॉर्जियाची राजधानी त्बिलिसी येथील रिचर्ड लुगार प्रयोगशाळेत तसेच काही नमून्यांवरील परिक्षण ब्रिटन, जर्मनीमधील प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आले. या प्रयोगशाळा पेंटॅगॉनशी संबंधित असल्याचा आरोप किरिलोव्ह यांनी केला. यापेकी जॉर्जिया येथील प्रयोगशाळेत झालेल्या संशोधनावेळी अमेरिकेचे निरिक्षक देखील उपस्थित होते, याची माहिती किरिलोव्ह यांनी दिली.

२०१८ साली खेरसोन भागात डासांमुळे होणारा आजार पसरला होता. यासाठी खेरसोन येथील युक्रेनची लष्करी प्रयोगशाळा जबाबदार असल्याचा आरोप किरिलोव्ह यांनी केला. कारण या आजारासंबंधीचे संशोधन खेरसोन प्रयोगशाळेत सुरू होते व काही आठवड्यांनी यासंबंधीची कागदपत्रे गहाळ झाली. तर २०१८ सालीच डोनेस्क आणि लुगान्स्क प्रांतात क्षयरोग वेगाने पसरला होता. रशिया समर्थक असलेल्या या प्रांतातील पेस्को या गावातच ७० रुग्ण आढळले होते. याकडे किरिलोव्ह यांनी लक्ष वेधले.

संयुक्त राष्ट्रसंघातील रशियाचे राजदूत वॅसिली नेबेंझिया यांनी देखील युक्रेनमधील अमेरिकेच्या प्रयोगशाळांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली. रशियाने सादर केलेल्या प्रस्तावात युक्रेनमधील संघर्षबंदी लागू करून येथील नागरिकांना बाहेर काढले जावे. त्याचबरोबर अमेरिकेच्या जैविक प्रयोगशाळांची सखोल चौकशी व्हावी, असे सांगून नेबेंझिया यांनी काही पुरावेे सादर केले. तर या आरोपांवर अमेरिकेने आत्तापर्यंत दिलेली गोंधळलेली आणि चिंताग्रस्त प्रतिक्रिया पाहता, अतिशय धोकादायक आणि बेकायदेशीर संशोधन या प्रयोगशाळांमध्ये केले गेले, असा ठपका रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी ठेवला.

leave a reply