युक्रेनमधील युद्धात रशिया सिरिया व हिजबुल्लाहचे सहाय्य घेत आहे

- ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचा आरोप

हिजबुल्लाहचे सहाय्यकिव्ह – ‘युक्रेनमधील संघर्षात रशिया सिरियन लष्कर आणि हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचे सहाय्य घेत आहे’, असा आरोप ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने केला. याआधीही पाश्‍चिमात्य माध्यमांनी रशियावर युक्रेनमधील संघर्षात कंत्राटी जवान उतरविल्याचा ठपका ठेवला होता. युक्रेनी लष्कराच्या प्रतिकारामुळे रशियावर ही वेळ ओढावली, असे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे. पण युक्रेनी लष्कराच्या प्रतिकाराबाबत पाश्‍चिमात्य देश अपप्रचार करीत असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. उलट दहशतवादी गटांचा युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात वापर केला जात असल्याचा आरोप रशियाने केला होता.

रशियन लष्कर वेगाने युक्रेनची राजधानी किव्ह तसेच पश्‍चिम युक्रेनच्या दिशेने कूच करीत असल्याचे ब्रिटीश व युरोपिय माध्यमे सांगत आहेत. या संघर्षात युक्रेनच्या लष्कराला अधिकाधिक शस्त्रास्त्रांची आवश्यकता असल्याचे आवाहन युरोपिय नेते करीत आहेत. पण ब्रिटनचे संरक्षण मंत्रालय आणि गुप्तचर यंत्रणा या संघर्षाबाबत वेगळेच तपशील प्रसिद्ध करीत आहेत. युक्रेनचे लष्कर देत असलेल्या प्रतिकारामुळे रशियन फौजांची पिछेहाट सुरू आहे. या संघर्षात रशियाचे सुमारे सात हजार जवान मारले गेले. रशियन लष्कर राजधानी किव्हजवळ पोहोचले असले तरी त्यावर ताबा मिळविणे शक्य नसल्याचा दावा ब्रिटनचे संरक्षण मंत्रालय व गुप्तचर यंत्रणा करीत आहेत.

हिजबुल्लाहचे सहाय्यकोंडीत सापडलेल्या रशियाने सिरियन लष्कर आणि हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचे सहाय्य घेण्याची तयारी सुरू केली आहे, अशी माहिती ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. ब्रिटीश संरक्षण मंत्रालय व गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या या आरोपांवर रशियाने प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी युक्रेनचे सरकार रशियाविरोधी संघर्षात सिरियातील अल कायदा व आयएस संलग्न दहशतवादी संघटनांचे सहाय्य घेत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तर युक्रेनच्या सरकारने तुरुंगातील कैद्यांच्या हाती शस्त्रे देऊन या संघर्षात उतरविल्याचे रशियन वृत्तसंस्थांनी म्हटले होते.

दोन दिवसांपूर्वी रशियन लष्कराने युक्रेनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात १८० परदेशी कंत्राटी जवानांना ठार केल्याचा दावा केला होता. यामध्ये दक्षिण कोरियन लष्करातून निवृत्त झालेला स्पेशल फोर्सेसचा अधिकारी कॅप्टन ली ग्यून याचाही समवेश असल्याचे दावे प्रसिद्ध झाले होते. पण काही तासांपूर्वीच कॅप्टन ली याने या संघर्षात आपण अडकलो आहोत असे मान्य करून आपल्या सुटकेची मागणी केल्याची बातमी समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमधील लष्करी कारवाईचा हेतू सफल झाल्याचे आधीच जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे रशिया हे युद्ध लवकरच थांबविण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. पण युक्रेनी लष्कराच्या प्रतिकारामुळे रशियाला माघार घ्यावी लागत असल्याचे चित्र पाश्‍चिमात्य देश उभे करीत आहेत. यामुळे युक्रेनमधील रशियन लष्कराची आक्रमकता अधिकच वाढल्याचे दिसू लागले आहे.

leave a reply