रशियाची ‘एस-४००’ लवकरच भारताच्या ताफ्यात येणार

मॉस्को – रशिया भारताला एस-४०० या हवाई सुरक्षा यंत्रणेचा पुरवठा सुरू करीत आहे. लवकरच ही यंत्रणा भारताच्या ताफ्यात दाखल होईल. २०१८ सालच्या ऑक्टोबर महिन्यात भारत आणि रशियामध्ये ‘एस-४०० ट्रायम्फ’च्या खरेदीचा सुमारे ५.४ अब्ज डॉलर्सचा करार संपन्न झाला होता. अमेरिकेच्या निर्बंधांची पर्वा न करता, भारताने रशियाबरोबरील हा करार तडीस नेण्याची धमक दाखविली होती. अजूनही हा व्यवहार करणार्‍या भारतावर निर्बंध न लादण्याची घोषणा बायडेन प्रशासनाने केलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर, भारत व रशियामध्ये पूर्ण होत असलेला एस-४००चा करार उभय देशांच्या धोरणात्मक सहकार्याचा आधार भक्कम असल्याचे दाखवून देत आहे.

अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांबरोबरच आता भारत रशियाबरोबर देखील टू प्लस टू चर्चा करणार आहे. टू प्लस टू चर्चेमध्ये दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री सहभागी होतात. आत्ताच्या काळात भारत व रशियामध्ये होऊ घातलेली ही चर्चा महत्त्वपूर्ण ठरते. याच्याबरोबरीने डिसेंबर महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन भारताच्या भेटीवर येणार आहेत. रशियाने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या या दौर्‍याची घोषणा केली. एकीकडे अमेरिका व मित्रदेशांच्या आघाडीविरोधात रशिया चीनला संपूर्णपणे सहाय्य करीत असून अमेरिकेच्या धोरणांना कडाडून विरोध करीत आहे. मात्र चीन भारताच्या सुरक्षेला आव्हान देत असताना देखील, रशियाने चीनबरोबरील आपल्या मैत्रीचा भारताबरोबरील संबंधांवर परिणाम होऊ देणार नाही, असा संदेश दिला आहे. एस-४००ची भारताला विक्री करून रशियाने चीनला नाराज केले आहे. भारत-रशियातील या व्यवहारामुळे चीन खूश नाही. असे असले तरी रशिया भारताबरोबरील संबंधांचा स्वतंत्रपणे विचार करतो, असे सांगून रशियन राजनैतिक अधिकार्‍यांनी भारताबाबत आपण चीनचा दबाव स्वीकारणार नाही, असे संकेत दिले होते. लडाखच्या एलएसीवर भारत आणि चीनच्या लष्करामध्ये संघर्ष झाल्यानंतरही रशियाने एस-४०० सह भारताला हवा असलेला शस्त्रसाठा पुरविण्याची तयारी दाखविली होती.

असे असले तरी, भारताने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांच्या क्वाड सहकार्याला विरोध केला होता. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी क्वाडमधील भारताच्या सहभागावर टीका करून भारताची नाराजी ओढावून घेतली होती. कालांतराने परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी त्यावर दिलगिरी व्यक्त केली असली तरी, क्वाडमधील भारताचा सहभाग व भारताचे अमेरिकेबरोबरील सामरिक सहकार्य यामुळे रशिया अस्वस्थ असल्याचे वारंवार स्पष्ट झाले होते. मात्र भारताने अमेरिकेबरोबरील आपल्या सहकार्याचा रशियाबरोबरील मैत्रीपूर्ण संबंधांवर परिणाम होऊ देणार नाही, अशी ग्वाही वेळोवेळी दिली होती.

अशा काही मुद्यांवर भारत व रशियाचे मतभेद असले तरी दोन्ही देशांच्या परस्परांबरोबरील संबंध, सहकार्य व विश्‍वास याची दुसर्‍या कुणाशीही तुलना करता येणार नाही, असे उभय देशांचे नेते वारंवार सांगत आहेत. अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्यमाघार घेतल्यानंतर, अफगाणिस्तानातील तालिबानचा उदय ही भारत व रशियाच्या चिंतेचा विषय बनलेला आहे. नुकत्याच भारताने आयोजित केलेल्या अफगाणिस्तानविषयक बैठकीत याचे प्रतिबिंब पडले होते. रशिया व इराणसह रशियाचा प्रभाव असलेले मध्य आशियाई देश, या बैठकीत सहभागी झाले होते व त्यांच्यामुळे ही बैठक यशस्वी ठरल्याचे बोलले जाते. विशेषत: भारताला या बैठकीतून मिळालेल्या यशावर पाकिस्तानात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. रशिया व इराणच्या सहाय्याने भारत पुन्हा अफगाणिस्तानात आपला प्रभाव वाढविण्यात यशस्वी ठरेल का? असे प्रश्‍न पाकिस्तानचे पत्रकार विचारू लागले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, भारत आणि रशियामधील सहकार्याला फार मोठे सामरिक महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत, एस-४०० बाबत आलेली ही बातमी भारत व रशियातील मैत्रीपूर्ण सहकार्य अधोरेखित करीत आहे.

leave a reply