युरोपसह चीनमधील कोरोनाचे संकट भयावह स्तरावर

कोरोनाचे संकटबर्लिन/व्हिएन्ना/बीजिंग – शिथिल करण्यात आलेले निर्बंध, मंदावलेले लसीकरण व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन यामुळे युरोपसह चीनमध्ये कोरोनाच्या संकटाने भयावह रुप धारण केल्याचे दिसत आहे. युरोपमधील आघाडीचा देश व जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीने कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर तैनात करण्यात निर्णय घेतला आहे. तर ऑस्ट्रियात लस न घेतलेल्या नागरिकांसाठी ‘लॉकडाऊन’ची सक्ती करण्यात आली आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या उद्रेकानंतर जवळपास २१ प्रांतांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर येत आहे.

दोन महिन्यांपूर्वी जगातील प्रमुख देशांमध्ये कोरोनाची साथ हळुहळू नियंत्रणात येत असल्याचे चित्र समोर आले होते. अमेरिका, युरोप, आशिया या खंडांमधील अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण व बळींच्या संख्येत घसरण सुरू झाली होती. यामागे लसीकरणाचा वाढता वेग व निर्बंधांची अंमलबजावणी हे घटक कारणीभूत ठरले होते. साथीची तीव्रता कमी झाल्यानंतर अनेक देशांनी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येण्यासही सुरुवात झाली होती.

कोरोनाचे संकटमात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून चित्र बदलण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये रुग्णांची व बळींची संख्या दर आठवड्याला वेगाने वाढत आहे. सुरुवातीला पूर्व युरोपिय देशांना कोरोनाचा मोठा फटका बसल्याचे समोर आले होते. पण आता युरोपातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाच्या साथीचा धोका तीव्र होत असल्याचे दिसत आहे. जर्मनीसारख्या देशात दरदिवशी आढळणार्‍या रुग्णसंख्येचे नवे विक्रम नोंदविण्यात येत आहेत. रुग्णालयांमधील अतिदक्षता विभाग जवळपास पूर्ण क्षमतेने भरल्याची माहिती आरोग्य यंत्रणांनी दिली आहे.

जर्मनीतील वाढत्या साथीमागे मंदावलेले लसीकरण व लस न घेतलेले नागरिक हे प्रमुख घटक ठरले आहेत. जर्मनीच्या मावळत्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी गेल्या आठवड्यात जनतेला भावनात्मक आवाहन करताना लस घ्या, अशी विनंती केली आहे. पण त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आता लष्करी तैनातीचा निर्णय घेण्यात आला आहे. जर्मन सरकारने आरोग्य यंत्रणांना सहाय्य करण्यासाठी १२ हजार जवानांच्या तैनातीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जवळपास ६०० हून अधिक जवान तैनातही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनाचे संकटजर्मनीचा शेजारी देश असणार्‍या ऑस्ट्रियाने लस न घेतलेल्या नागरिकांसाठी (अनव्हॅक्सिनेटेड) स्वतंत्र लॉकडाऊनची घोषणा केली. रविवारी हा निर्णय जाहीर करण्यात आला असून त्याविरोधात देशात निदर्शनेही सुरू झाली आहेत. ऑस्ट्रियाची लोकसंख्या सुमारे ९० लाख असून त्यातील २० लाख जणांनी अद्यापही लस घेतलेली नाही. अशा प्रकारे लस न घेणार्‍यांसाठी ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी करणारा ऑस्ट्रिया हा पहिलाच युरोपिय देश ठरला आहे.

दरम्यान, कोरोना साथीचे उगमस्थान असणार्‍या चीनमध्येही कोरोनाच्या नव्या उद्रेकाने हाहाकार उडविला आहे. गेल्या चार आठवड्यात चीनमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’चे जवळपास दीड हजार रुग्ण आढळले आहेत. चीनमधील २१ प्रांतांमध्ये हा फैलाव झाला असून त्यात राजधानी बीजिंगचाही समावेश आहे. डालिअन शहराला सर्वाधिक फटका बसला असून गेल्या १० दिवसात २३०हून अधिक रुग्ण आढळल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. चीनच्या लिओनिंग प्रांतातील झुआन्गे शहरात जवळपास १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आल्याचे सांगण्यात येते. चीनने कोरोना साथीदरम्यान ‘झिरो कोविड पॉलिसी’ राबवूनही देशाच्या विविध भागांमध्ये नवे उद्रेक समोर येत आहेत. ही बाब चीनचे सत्ताधारी तसेच प्रशासनासमोरील चिंता वाढविणारी असल्याचा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply