कोरोना पाठोपाठ रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याचा धोका वाढला

-वर्ल्ड बँकेचा इशारा

वॉशिंग्टन – कोरोनाच्या साथीमुळे बसलेला फटका व त्यापाठोपाठ सुरू झालेले रशिया-युक्रेन युद्ध यामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याच्या प्रक्रियेने वेग पकडल्याचा इशारा ‘वर्ल्ड बँके’च्या नव्या अहवालात देण्यात आला. आर्थिक विकासात होणारी घसरण व भडकलेली महागाई ही स्थिती पुढील काही काळासाठी कायम राहण्याची शक्यता आहे, असेही वर्ल्ड बँकेने आपल्या अहवालात बजावले. जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ ठप्प होण्याची भीती असून याचा global-economyसर्वाधिक धक्का मध्यम तसेच कमी उत्पन्न असलेल्या देशांना बसेल, याकडेही वर्ल्ड बँकेने अहवालात लक्ष वेधले आहे. या वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ 2.9 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. 2021 साली जागतिक अर्थव्यवस्थेने 5.7 टक्के वेगाने प्रगती नोंदविली होती. त्याचा विचार करता अर्थव्यवस्थेत मोठी घसरण होण्याची भीती वर्ल्ड बँकेने व्यक्त केली. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या उलथापालथी होत असून गुंतवणूक व व्यापाराला जबरदस्त फटका बसला आहे. कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था सावरण्यासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय तसेच अर्थसहाय्यही मागे घेण्यात आले आहे. त्याचवेळी जागतिक पातळीवरील उत्पादनांच्या मागणीतही घट होताना दिसत आहे, असा दावा वर्ल्ड बँकेने आपल्या अहवालात केला. कोरोनाची साथ व युद्ध यामुळे विकसनशील देशांमधील दरडोई उत्पन्नात जबरदस्त घसरण होत आहे. कोरोनापूर्वी असणाऱ्या दरडोई उत्पन्नाच्या पातळीत तब्बल पाच टक्क्यांची घसरण होईल, अशी चिंता वर्ल्ड बँकेने आपल्या अहवालात व्यक्त केली. ‘युक्रेनचे युद्ध, चीनमधील लॉकडाऊन्स, जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी व विकासदर कुंठित होण्याचा धोका यामुळे आर्थिक विकासाला सातत्याने धक्के बसत आहेत. या स्थितीत जगातील अनेक देशांना आर्थिक मंदी टाळणे अशक्यप्राय ठरेल’, असा इशारा वर्ल्ड बँकेने दिला. ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टस्‌‍’ नावाच्या अहवालात वर्ल्ड बँकेने सध्याच्या स्थितीची तुलना 1970मधील विकासदर ठप्प होण्याच्या स्थितीशी (स्टॅग्फ्लेशन) केली आहे. जगातील दोन आघाडीच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिका व चीन या दोन्ही देशांचा विकासदर अर्ध्याहून खाली येण्याची शक्यता वर्ल्ड बँकेने वर्तविली आहे. अमेरिकेने गेल्या वर्षी 5.7 टक्के विकासदर नोंदविला होता. यावर्षी तो अडीच टक्क्यांपर्यंत खाली येईल. तर चीनने गेल्या वर्षी 8.1 टक्के दराने प्रगती केली होती मात्र यावर्षी हा दर 4.3 टक्क्यांपर्यंत घसरेल, असे वर्ल्ड बँकेने नमूद केले आहे. दोन महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही जागतिक अर्थव्यवस्थेबाबत धोक्याचा इशारा दिला होता. ‘युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता अधिकच वाढली आहे. या अनिश्चिततेचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीवर होऊ शकतो व ती मंदावण्याची शक्यता आहे’, असे नाणेनिधीने बजावले होते.

leave a reply