रशियाची जपानबरोबरील ‘कुरिल’ संबंधी करारातून माघार

putin-kishidaमॉस्को/टोकिओ – रशिया आणि जपान यांच्यात वादाचा मुद्दा असणाऱ्या कुरिल बेटांसंबंधी करारातून रशियाने माघार घेतली आहे. दोन दशकांपूर्वी झालेल्या या करारानुसार जपानने रशियाबरोबरील व्यवहारातील देणी चुकती केली नाहीत, असा आरोप करून रशियन परराष्ट्र मंत्रालयाने करार मोडला. काही तासांपूर्वी जपानने नाटोबरोबरील लष्करी सहकार्य वाढविणे आणि युद्धसरावाचे आयोजन करण्याबाबत चर्चा केली होती. त्यावर रशियाकडून ही प्रतिक्रिया आल्याचे दिसत आहे.

मंगळवारी जपानचे संरक्षणमंत्री नोबुआ किशी यांनी नाटोच्या लष्करी समितीचे प्रमुख रॉब बोर यांची भेट घेतली. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांवर या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच येत्या काळात जपान युरोपिय देशांबरोबर सहकार्य वाढविणार असल्याची चर्चा पार पडली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील विस्ताराबाबत नाटोच्या सुरू असलेल्या हालचालींचे जपानचे संरक्षणमंत्री किशी यांनी स्वागत केले.

सध्या भूमध्य समुद्रात सुरू असलेल्या नाटोच्या सरावात जपानचे लष्कर देखील सहभागी झाले आहे. येत्या काळात अशा युद्धसरावांमधील जपानच्या लष्कराचा सहभाग तसेच नाटोच्या संरक्षणखर्चातही जपानचा हिस्सा वाढविण्यावरही चर्चा झाली. यामुळे येत्या काळात नाटो आणि जपानमधील लष्करी सहकार्य अधिक दृढ होईल, असा दावा पाश्चिमात्य माध्यमांनी केला. या भेटीला काही तास उलटत नाही तोच, रशियाने जपानबरोबरच्या करारातून माघार घेतल्याची घोषणा केली.

russia japan islandरशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी ‘कुरिल’ बेटांबाबतच्या करारातून माघार घेतल्याचे जाहीर केले. रशियाच्या या घोषणेवर जपानने टीका केली. रशियाचा एकतर्फी निर्णय अतिशय निंदनीय असल्याचे ताशेरे जपानने ओढले आहेत. त्याचबरोबर कुरिल बेटांच्या हद्दीतील आपल्या जहाजांच्या सुरक्षेसाठी जपान सर्वतोपरि प्रयत्न करील, असे जपानने ठणकावले. 1998 साली झालेल्या करारानुसार, रशियाने जपानला कुरिल बेटांच्या हद्दीत मासेमारी करण्याची परवानगी दिली होती. व्यवहाराच्या मोबदल्यात रशियाने जपानला ही सवलत दिली होती. रशिया कुरिल बेटे हा आपला भूभाग असल्याचा दावा करीत आहे. तर ‘नॉर्दन टेरिटरीज्‌‍’ म्हणून ओळखण्यात येणारी कुरिल बेटे जपानच्या चार बेटसमुहांपैकी एक असल्याचे जपानचे म्हणणे आहे.

गेल्या कित्येक दशकांपासून जपान व रशियामध्ये हा वाद सुरू आहे. या वादामुळे रशियाने जपानबरोबर दुसऱ्या महायुद्धानंतरचा शांतीकरारही केला नव्हता. त्यामुळे कुरिल बेटासंबंधी करारातून माघार घेतल्यामुळे या क्षेत्रात रशिया व जपानच्या विनाशिका आमनेसामने येण्याचा धोका वाढला आहे.

leave a reply